Home > News Update > ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे निधन

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे निधन

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे निधन
X

मैदानी क्रिकेटचा अस्सल पत्रकार, रोखठोक आणि स्पष्ट वक्ता अशी ओळख असलेले ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नयना आणि कन्या मुग्धा असा परिवार आहे. गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

"आपलं महानगर" या सांध्यदैनिकाच्या स्थापनेपासून पत्रकारितेत उतरलेले कर्णिक यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात वर्तमानपत्राच्या व्यवस्थापन आणि वितरणापासून केली. त्यानंतर 1996 पासून त्यांच्या क्रीडा पत्रकारितेचा श्रीगणेशा झाला. वर्तमानपत्रात डेस्कवर बसून बातम्या भाषांतरित करण्यापेक्षा मैदानात उतरून रिपोर्टिंग करण्यातच त्यांना अधिक धन्यता वाटत असे. तब्बल पंधरा वर्षे त्यांनी "आपलं महानगर'’ मध्ये क्रीडा पत्रकारिता केली. मैदानी क्रिकेट हा त्यांचा जीव की प्राण असल्यामुळे शालेय क्रिकेट आणि क्लब क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ते नावानिशी ओळखायचे. ही त्यांची खासियत होती. त्यामुळे अनेक शालेय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतरही कर्णिकांच्या संपर्कात होते.

80 च्या दशकात क्रीडा विश्वात प्रसिद्ध असलेल्या "षटकार" या क्रीडा पाक्षिकाच्या निर्मितीची जबाबदारी कर्णिक यांनी तब्बल दोन दशकांपेक्षा अधिक काळ सांभाळली. तसंच काही काळ त्यांनी "दै.लोकमत" च्या मुंबई आवृत्तीतही क्रीडा विभागात काम पाहिले. त्याचप्रमाणे "अक्षर प्रकाशन" आणि "सदामंगल प्रकाशन"च्या अनेक पुस्तकांची निर्मिती आणि वितरणाची जबाबदारीही त्यांनीच पार पाडली. मैदानी क्रिकेटच्या निमित्ताने नेहमीच शिवाजी पार्क, ओव्हल, क्रॉस आणि आझाद मैदानात संचार असायचा. क्रिकेटच्या निमित्तानं त्यांनी भारतभर अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वार्तांकन केले.

क्रिकेट व्यतिरिक्त कबड्डी आणि खो-खो खेळांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या अध्यक्षपदाखालीच मराठी क्रीडा पत्रकार संघाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 2006 साली "सुवर्ण बॅट" देऊन सत्कार केला होता. तसेच मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या क्रीडा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने युरोप दौराही केला.

Updated : 20 Sep 2019 6:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top