Home > News Update > ज्येष्ठ पर्यावरण जागरूक कार्यकर्ते सुजित पटवर्धन कालवश

ज्येष्ठ पर्यावरण जागरूक कार्यकर्ते सुजित पटवर्धन कालवश

ज्येष्ठ पर्यावरण जागरूक कार्यकर्ते सुजित पटवर्धन कालवश
X

ज्येष्ठ पर्यावरण जागरूक कार्यकर्ते सुजित पटवर्धन यांचं शनिवारी पहाटे अल्पशः आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या वर पुण्यातील जोशी रूग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

पर्यावरण विषयक वेगळ्या दृष्टिकोनातून समाज जागृती करणारे सूजित पटवर्धन यांचं अल्पशः आजाराने 22 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असता निधन झाले. त्यांच्या जाण्याने पर्यावरणासाठी जागरूक राहून संघर्ष करणाऱ्यांपैकी एक खंदा कार्यकर्ता हरपल्याची भावना पर्यावरणप्रेमींमध्ये आहे.

त्यांनी 1982 मध्ये परिसर या पर्यावरण जागृती करणारी संस्था पुणे येथे स्थापन केली. तसेच अक्षर नंदन या उपक्रमशील शाळेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. नर्मदा बचाओ आंदोलन, लवासा विरोधी आंदोलन तसेच शहरांच्या पर्यावरण केंद्रीत समस्या यात ते सहभागी होते. नागरिकांना सोबत घेऊन समविचारी संस्थांसह सक्रियतेने समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

औद्योगिक आणि शहरी विकासामुळे पर्यावरणाची हानी आणि नाश होणार नाही याची खात्री करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी कायदेशीर मार्गानेही प्रयत्न केले. लवासाविरोधी लढ्यात आणि खटल्यात ते एक फिर्यादी होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य पर्यावरण संरक्षण समिती, महाबळेश्वर आणि पाचगणी येथील बांधकाम परवानग्यांवर देखरेख ठेवणारी उच्च न्यायालय समिती, महाबळेश्वर पाचगणी प्रादेशिक नियोजन मंडळ, पीएमसीची नागरी वारसा समिती (पुणे महानगरपालिका), विकास योजना सुकाणू समिती अशा अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे.

पुणे महानगर पालिकेसाठी 1990 च्या दशकाच्या मध्यापासून त्यांनी शाश्वत शहरी वाहतूक धोरणाच्या बाजूने लक्ष केंद्रित केले. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बळकट करावी यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. नुसते रस्ते रुंद करून किंवा फ्लाय ओव्हर बांधून वाहतूक समस्या सुटणार नाही असे ते आग्रहाने प्रतिपादन करत.

त्यांचे शालेय शिक्षण ऋषी व्हॅली येथे झाले तर लंडन येथून त्यांनी छपाई बाबतचे उच्च शिक्षण घेतले.

छपाई क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. ते स्वतः एक चित्रकार होते. त्यांना जाझ संगीताबद्दल आवड होती. त्यांच्यामागे अक्षर नंदन शाळेच्या विद्या पटवर्धन यांचे ते पती होते. दोन कन्या, जावई, नातवंडे आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा मोठा परिवार त्यांच्यामागे आहे.

Updated : 22 Oct 2022 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top