Home > News Update > समीर वानखेडे NCBच्या विभागीय संचालकपदावरुन जाणार?

समीर वानखेडे NCBच्या विभागीय संचालकपदावरुन जाणार?

समीर वानखेडे NCBच्या विभागीय संचालकपदावरुन जाणार?
X

मुंबई : आर्यन खानवर ड्रग्ज प्रकरणी केलेली कारवाई, त्यानंतर नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेले समीर वानखेडे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे यांची NCBचे विभागीय संचालक म्हणून असलेली कारकिर्द आता संपण्याची शक्यता आहे. या पदावरील त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या पदावर त्यांना मुदतवाढ मिळते की त्यांना आपल्या मूळ विभागात परतावे लागेल असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार समीर वानखेडे हे NCBचे विभागीय संचालक म्हणून मुदतवाढ घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसते.

मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रुझवर NCBने टाकलेल्या छाप्यात आर्यन खानसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता, तसेच वानखेडे यांनी आपला धर्म लपवून मागासवर्गातून नोकरी मिळवल्याचाही आरोप मलिक यांनी पुराव्यांच्या आधारे केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला. तसेच त्यांची विभागांतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर आता समीर वानखेडे यांच्याकडे असलेल्या एनसीबीच्या विभागीय संचालक पदाचा कार्यकाळ संपण्यास आता केवळ १३ दिवस शिल्लक आहेत. समीर वानखेडे स्वत: या पदावर राहण्यास उत्सुक नसल्याचे दिसते आहे, कारण ते मुदतवाढीसाठी कोणतेही प्रयत्न कऱणार नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. आता समीर वानखेडे यांच्या जागी एनसीबीच्या विभागीय संचालक पदी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 18 Dec 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top