Home > News Update > परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे सट्टेबाजांकडून पैसे वसूल करायचे: मुंबई पोलिसांची न्यायालयात माहिती

परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे सट्टेबाजांकडून पैसे वसूल करायचे: मुंबई पोलिसांची न्यायालयात माहिती

परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे सट्टेबाजांकडून पैसे वसूल करायचे: मुंबई पोलिसांची न्यायालयात माहिती
X

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. खंडणी आणि अटेलिया प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे हे परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून क्रिकेट सट्टेबाजांकडून पैसे उकळत होते, अशी माहिती असे मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. त्यामुळं परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार आहेत.

सचिन वाझे यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. तर दुसरीकडे परमबीर सिंह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत, त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे न्यायालयाने शनिवारी वाझे यांच्या पोलीस कोठडीत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील रेस्टॉरंट मालकाने वाझे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सरकारी वकील शेखर जगताप यांनी परमबीर सिंह यांच्या बाबत न्यायालयात माहिती देताना, परमबीर सिंह आणि सचिन वाजे हे क्रिकेट सट्टेबाजांना एफआयआर दाखल करण्याची धमकी द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. अशी माहिती न्यायालयात दिली आहे.

हफ्ता वसूली...

दरम्यान, परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र, शनिवारी मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, वाझे परमबीर सिंहच्या सांगण्यावरून इतर लोकांकडून देखील पैसे उकळत होते का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

पोलिसांनी असंही म्हटलं की, वाझे हे सिंह यांच्या जवळचे होते. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस प्रमुख सध्या कुठे आहेत याचीही माहिती त्यांच्याकडून मिळू शकते. दरम्यान, जप्त केलेले पैसे कसे वाटले जायचे आणि त्याची बैठक कुठे व्हायची? याचा देखील शोध घेत असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळले जायचे का? याचा देखील शोध मुंबई पोलीस घेत आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांनी स्वच्छेने त्यांच्या आवाजाचे नमुने दिले असून ते फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं देखील मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितंल. असं म्हंटल जातंय की, सचिन वाझे यांनी परमबीर सिंग यांना व्हॉट्सअॅपवर फोन केले होते. पोलिसांनी त्याच्याशी संबंधित दोन फोनही जप्त केले आहेत, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती. या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी सध्या ED करत आहे.

Updated : 7 Nov 2021 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top