Home > News Update > सचिन पायलट यांना शिक्षा, पण गेहलोत सरकारवर टांगती तलवार कायम

सचिन पायलट यांना शिक्षा, पण गेहलोत सरकारवर टांगती तलवार कायम

सचिन पायलट यांना शिक्षा, पण गेहलोत सरकारवर टांगती तलवार कायम
X

आपल्याच सरकारविरुद्ध बंड करणाऱ्या सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढून टाकण्याचा मोठा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या कारवाईनंतर सचिन पायलट यांनी ट्विट केले आहे. “सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।” असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. एकूणच सचिन पायलट यांच्या या भूमिकेमुळे गेहलोत यांच्या सरकारवरील टांगती तलवार कायम राहणार आहे.

राजस्थानमधील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज पार पडली. या बैठकीत आमदारांनी गेहलोत यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. सचिन पायलट आणि त्यांचे इतर काही समर्थक आमदार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. आकड्यांचे गणित पाहता काँग्रेसला सरकार पडण्याची चिंता नाहीये. पण ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात ज्योतीरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली तशी शक्यता सचिन पायलट यांच्याबाबत असल्याने काँग्रेसला आपल्या आमदारांना सांभाळून ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

२०१८मध्ये झालेल्या निवडणुकीत राजस्थानात काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसचा मित्रपक्ष आरएलडीने १ जागा जिंकली होती. भाजपला ७३ जागा मिळाल्या होत्या. बसपाला - ६, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला- ३, सीपीआय एम आणि भारतीय ट्रायबल पार्टी यांनी प्रत्येकी दोन दोन जागा मिळाल्या होत्या. पण नंतर काही महिन्यांनी बसपाच्या सर्व आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसंच पोटनिवडणुकीत भाजपची मंडवाना इथली जागाही काँग्रेसने जिंकून घेतल्याने सध्या काँग्रेसचे 107 आमदार आहेत.

राजस्थानातील सध्याचे पक्षीय बलाबल

एकूण जागा – २००

काँग्रेस – १०७

भाजप - ७२

अपक्ष – १३

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी – ३

सीपीआय (एम) – २

भारतीय ट्रायबल पार्टी – २

राष्ट्रीय लोकदल - १

पण आता सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक मंत्र्यांनाही पदावरुन हटवण्यात आले आहे. तसंच भारतीय ट्रायबल पार्टीने काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तर दुसरीकडे पायलट यांच्या समर्थकांकडून किमान १६ आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे भाजपने आता गेहलोत यांना बहुमत सिद्ध करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस काँग्रेससाठी रात्र वैऱ्याची आहे.

Updated : 14 July 2020 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top