ShivSena Mouthpiece : मुंबईचे ‘अदानीस्तान’ होताना… मराठी माणसाचा झेंडा टिकेल का?
X
BMC election results 2026 महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर नव्या वादळाची चाहूल लागली आहे. काल (१६ जानेवारी) पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ShivSena Mouthpiece शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या Samana ‘सामना’च्या अग्रलेखाने आज (१७ जानेवारी) सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे. “मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे भवितव्य काय? मराठी माणसाला आधार कुणाचा? या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय?” असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखात उपस्थित केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-महायुतीने मोठ्या प्रमाणात यश मिळवले असून, राज्यातील बहुसंख्य महापालिकांवर (मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक आदी) भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मात्र, या निकालाकडे पाहताना हा ‘मराठी अस्मितेवर हल्ला’ असल्याचं म्हटले आहे. मुंबई आता ‘अदानीस्तान’ बनत चालली आहे. मोठ्या उद्योगपतींच्या हितसंबंधांमुळे मराठी माणसाचे हक्क, भाषा आणि संस्कृती धोक्यात आली आहे.
काय म्हटलंय सामानाच्या मुखपत्रात ?
अग्रलेखात म्हटलं आहे की,
मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी नाही, तर मराठी माणसाची ओळख आहे. ती आता ‘बाहेरील ताकदी’च्या हाती जात आहे. मराठी माणसाला आधार देणारे नेते आणि पक्ष कोण? सत्ताधारी महायुती मराठी अस्मितेचे रक्षण करत नाही, उलट तिच्यावर प्रहार करत आहेत. निवडणुकीत ‘मसल पॉवर’ आणि ‘मनी पॉवर’चा वापर झाला. मराठी माणसाने जागे राहून आपली अस्मिता वाचवावी.
अदानी ग्रुपसारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रकल्पांमुळे मुंबईचे स्वरूप बदलत आहे. स्थानिकांना रोजगार, घर आणि हक्क मिळत नाहीत. तसेच मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत अदानी धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपाने पाहिले. ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद मिंध्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाष्य केलं असून काँग्रेस -वंचितने या निवडणुकांत सवतासुभा केला, पण मुंबईत त्यांना २५ चा पल्लाही पार करता आला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखंड महाराष्ट्राचे व मुंबई मराठी माणसाच्या हाती रहावी या ठाम मचाचे होते. त्यांचे राजकीय वारसदार प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारला.
दरम्यान मुंबई व मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही. असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.






