News Update
Home > News Update > रुपाली ठोंबरे पाटील यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र' ; राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा

रुपाली ठोंबरे पाटील यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र' ; राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा

रुपाली ठोंबरे पाटील यांचा मनसेला जय महाराष्ट्र ; राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा
X

पुणे // मनसेच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पण, राज ठाकरेंना भेटण्याआधीच राजीनामा का दिला या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे NCP च्या वाटेवर असण्याची चर्चा आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहे. मात्र, राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याआधीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला. एकीकडे मनसेकडून पुणे पालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वादामुळे मनसेला रामराम ठोकल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे रुपाली पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आल्या होत्या. कोरोनाच्या काळामध्ये कामानिमित्ताने अनेक वेळा रुपाली पाटील या अजितदादांच्या बैठकीला हजर होत्या. रुपाली पाटील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला आणि बैठकीला हजर राहिल्याने त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, वैयक्तिक कामानिमित्ताने भेट होती असं सांगून रुपाली पाटील यांनी चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण, आता रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्याने त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील. यापुढेही आपले आशीर्वाद आणि "श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

रुपाली पाटील यांची पुण्यातील मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात सहभाग घेतला. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.

Updated : 15 Dec 2021 1:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top