भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध
X
सोलापूर // भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आलेत. RBI कडून निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याकडून दी. लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबत आदेश कढला आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बँकेवर दोन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर ठेविदारांना ठेवी परत मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 1,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत लादलेले निर्बंध 12 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाजाचे तास बंद झाल्यानंतर सहा महिने लागू राहतील. यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाणार आहे.






