अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पालिका आयुक्तांनी प्रशासनावरील पकड सिद्ध करावी- रवी राजा
X
मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका असे सांगितले आहे. मुंबईमध्ये कोरोना प्रादुर्भावादरम्यान गेल्या दीड वर्षात 84 हजार 364 अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आल्या आहेत. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पालिका आयुक्तांनी आपली प्रशासनावर पकड असल्याचे सिद्ध करून दाखवावे. सोबतच पालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सुरू असलेला भ्रष्टाचार आयुक्तांनी रोखून दाखवावा असे आव्हान मुंबई महानगपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, कारवाई करा असे आदेश महापालिकेला दिले आहेत. मुंबईमध्ये गेल्या दीड वर्षात 84 हजार 264 अनधिकृत बांधकामे झाल्याची नोंद पालिककडे नोंद आहे. त्यापैकी केवळ 5 टक्के बांधकामावर कारवाई झाली. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने कोर्टाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नका असे म्हटले होते. आता कोर्टाने आपले आदेश मागे घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास परवानगी दिली. मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष तसेच पालिकेतील विरोधी पक्ष आपल्यासोबत असल्याने या अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करून दाखवावी असे आव्हान रवी राजा यांनी केले.
सोबतच आमच्याकडे अनेक अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येतात. आम्ही त्याबाबत आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो. त्यावर कारवाई न झाल्यास आयुक्तांची भेटही घेतो. आयुक्त अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र, अधिकारी आयुक्तांना चुकीची माहिती देतात. पालिकेतील काही अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. मात्र काही अधिकारी अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत आहेत. असं राजा यांनी म्हटले आहे.
एखाद्या झोपडी धारकाने बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र मोठ्या इमारतींमध्ये जे बांधकाम होते, त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असे राजा म्हणाले.






