Home > News Update > राजीव गांधी स्मृतीदिन: कॉंग्रेस राज्यात 111 अॅम्ब्युलन्सचं वाटप करणार...

राजीव गांधी स्मृतीदिन: कॉंग्रेस राज्यात 111 अॅम्ब्युलन्सचं वाटप करणार...

राजीव गांधी स्मृतीदिन: कॉंग्रेस राज्यात 111 अॅम्ब्युलन्सचं वाटप करणार...
X

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी आज काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून १११ अॅम्ब्युलन्स राज्यातील जनतेला देण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅम्ब्युलन्स संदर्भात पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात या निमित्ताने ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष शाम पांडे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते. तर काँग्रेसचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते. देशातील तरुणाईची ताकद जगाला दाखवून देण्याचा त्यांचा संकल्प होता. २० व्या शतकातच भारताला २१ व्या शतकाचे स्वप्न त्यांनी दाखवले आणि त्यादृष्टीने पाऊले उचलली. आजच्या डिजीटल भारताची पायाभरणी ही राजीव गांधी यांनी केली होती. या दृष्ट्या नेत्यांवर विरोधी पक्षाने खोटे आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचे काम जाणीवपूर्वक केले. आधुनिक भारताची पायाभरणी करणारे राजीव गांधी हे देशासाठी जगले आणि देशासाठीच त्यांनी प्राणाचे बलिदान दिले.

संकटकाळात काँग्रेस पक्ष कायमच या देशातील नागरिकांसोबत राहिला आहे. कोरोना संकट काळात काँग्रेस पक्षाकडून सातत्याने मदत कार्य सुरु आहे. आज राजीवजींच्या हौतात्म्य दिनी हाच जनसेवेचा वारसा पुढे घेऊन जात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात १११ अॅम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस तर्फे ५१ लाख आणि मुंबई काँग्रेस तर्फे १० लाख मास्क वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजीव गांधी हे सर्वांच्या अंतकरणातील व्यक्तीमत्व होते. आधुनिक भारत घडवणारे विचार, देशाची एकता, बंधुता अबाधित राखण्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २१ मे हा दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. सध्या कोरोनाचे संकट असल्याने काँग्रेस पक्ष गोरगरिब गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. सोनियाजी गांधी यांच्या आवाहनानुसार काँग्रेस कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आणि आत्ताही मदतीचे हे कार्य जोमाने सुरु आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, कोरोनामुळे दीड वर्षापासून लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले, गोरगरिबांचे अपरिमित नुकसान झाले, रोजीरोटी मिळणेही मुश्कील झाले आहे, परिस्थिती कठीण आहे. या कठीण परिस्थितीतही महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट काम करून देशात आदर्श घालून दिले आहे. केंद्राने या कामात मोकळ्या हाताने मदत केली नाही, लसी कमी पुरवल्या, वैद्यकीय मदत अपुरी केली तरीसुद्धा नियोजन करून महाराष्ट्राने लसीकरणात देशात आघाडी घेतली. काँग्रेस पक्ष राज्य सरकारसोबत मिळून लोकांना मदत करत आहे. हे मदत कार्य सुरुच राहील.

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या पुढाकारातून चेंबूर येथे सुरु करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना काळात स्वतःचे जीव धोक्यात घालून जनतेची मदत करणा-या पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी, मुंबई महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला.

तत्पूर्वी सकाळी कुपरेज मैदान, नरिमन पाईंट येथे राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिवादन केले. मुंबई काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला व प्रार्थना सभेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह उपस्थित होते.

Updated : 21 May 2021 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top