Home > Max Political > `थलैवा` रजनीकांतची अखेर राजकीय एन्ट्री

`थलैवा` रजनीकांतची अखेर राजकीय एन्ट्री

`थलैवा` रजनीकांतची अखेर राजकीय एन्ट्री
X

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि मराठमोळा शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांतनं अखेर सर्व राजकीय चर्चांना पुर्णविराम देत अखेर स्वतःचाच राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. गुरूवारी रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत चमत्कार करील असंही यावेळी सांगण्यात आलं.

सोमवारी रजनीकांत यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसंच लवकरच आपला राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता त्याच वेळी ही भेट झाली होती. नुकतेच तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना त्यांच्या राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नव्हता. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते.

गेल्या काही दिवसात रजनीकांत यांच्या नावे असणारं एक पत्र तामिळनाडूत व्हायरल झालं होतं. डॉक्टरांनी करोना काळात प्रचार कऱण्यावरुन रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी रजनीकांत यांनी अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी हे पत्र आपलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेस तसंच स्थानिक पक्षांनी हा रणनीतीची भाग असल्याचा दावा केला होता.

रजनीकांत यांनी डिसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. परंतू आता तामिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा आहे. रजनीकांत यांना भाजपसोबत घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून सातत्यानं सुरु होते. आता स्वतःच्या पक्षाकडून बळ घेऊन नंतर भाजपसोबत तर जाणार नाही ना याकडेही राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Updated : 3 Dec 2020 12:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top