Home > Max Political > राजस्थान सरकार अस्थिर, आज गेहलोत यांची परीक्षा

राजस्थान सरकार अस्थिर, आज गेहलोत यांची परीक्षा

राजस्थान सरकार अस्थिर, आज गेहलोत यांची परीक्षा
X

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याने सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजस्थानात आज काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे.

सचिन पायलट यांनी आपल्यासोबत पक्षाचे 30 आमदार आणि इतर काही अपक्ष आमदार असल्याने गेहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केल्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग आला आणि त्यानंतर रविवारी रणदीप सुरजेवाला आणि अजय माकण हे जयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

“सरकारला कोणताही धोका नाही, आम्ही पाच वर्ष पूर्ण करणार, भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी राजस्थानातील सत्तास्वप्न पाहू नये” असं सुरजेवाला यांनी म्हटले आहे. तसंच आजच्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. एवढेच नाहीतर सर्व आमदारांनी आपल्या सह्यांचे पत्र दिले असून सरकारला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे, असा दावा काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला आहे. तसंच बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांनर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा दिला आहे.

राजस्थानमध्ये आमदारांच्या फोडाफोडीचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलिसांनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाच नोटीस बजावल्यानंतर गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष चिघळला आहे. सचिन पायलट हे दिल्लीत असून त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे.

राजस्थानातील 200 पैकी 107 जागा काँग्रेसकडे आहेत. तसंच 10 अपक्ष आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे 2 आणि भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पण आता यापैकी काँग्रेसचे 30 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजस्थानातील पक्षीय बलाबल

एकूण जागा 200

काँग्रेस – 107

भाजप- 72

अपक्ष – 13

इतर – 8

Updated : 13 July 2020 2:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top