Home > News Update > अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरमध्ये पावसाचे पाणी, रुग्णांचे हाल

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरमध्ये पावसाचे पाणी, रुग्णांचे हाल

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरमध्ये पावसाचे पाणी, रुग्णांचे हाल
X

रायगड - जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका इमारतीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधील पुरुष कक्षात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील रुग्णाचे हाल होत आहेत. नव्याने बांधलेल्या या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले होते.

कक्षाच्या भिंतीतून पाण्याची गळती सुरू आहे. तर खिडक्यांमधून पाणी झिरपत आहे. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. पण रुग्णालये सुस्थितीत व सुरक्षित नसल्याचे या प्रकाराने समोर आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकारानंतर संताप व्यक्त केलाय. नर्सेससाठीची इमारत ही नुकतीच नव्याने बांधण्यात आली असून पहिल्या पावसातच ही इमारत गळू लागली आहे. त्यामुळे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यासाठी एकच स्वच्छतागृह असल्याने दोघांनाही अडचणी येत आहेत.

परिचारिका इमारतीचे केले कोव्हिड सेंटर

अलिबाग तालुका कोरोनाचा हॉटस्फोट बनत आहे. अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय इमारतीत 70 बेडचे कोविड सेंटर बनविण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालय परिसरात बांधण्यात आलेल्या परिचारिका इमारतीचे कोविड सेंटरमध्ये रूपांतरित केले आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर ही इमारत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी 90 कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

2013 साली अलिबाग जिल्हा सामान्य रुगणालयात परिचारिका प्रशिक्षण इमारत मंजूर करण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराकडून काम संथ गतीने सुरू असल्याने ही इमारत अपूर्णावस्थेत होती. कोरोना प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू लागल्याने रुग्णांसाठी जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे अपूर्णावस्थेत असलेली परिचारिका इमारत कोविड सेंटरसाठी वापराकरीता घेण्यात आली. यासाठी अपूर्ण असलेल्या इमारतीचे काम दुसरा ठेकेदार लावून पूर्ण करण्यात आले. या इमारतीवर करोडो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. नुकतेच महिनाभरापूर्वी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या इमारतीचे उद्घाटन केले होते. या इमारतीत कोरोना रुगांसाठी पुरुष, महिला, तसेच मुलासाठी कक्ष तयार केले आहेत. तर म्यूकरमायकोसिस रुग्णांसाठीही कक्ष तयार करण्यात आलेला आहे.

काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पहिल्या पावसातच इमारतीला गळू लागल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पावसाचा फटका हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नव्या कोविड सेंटरला बसला आहे. पावसाचे पाणी हे खिडकी वाटे आणि भिंतीवाटे कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या कक्षात घुसले आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवले असल्याने त्याचे हाल झाले आहेत.

कोव्हिड सेंटरमध्ये महिला आणि पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. या कोविड सेंटरमध्ये एकच स्वछतागृह आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला यांना एकाच स्वछतागृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे स्वछतागृह असणे गरजेचे आहे. कोविड सेंटर सुरू झालेली ही इमारत नवीन असूनही ती समस्येच्या गर्तेत सापडली आहे. ठेकेदाराने इमारतीत केलेले ड्रेनेज कामही तकलादू आहे. स्वछतागृहसुद्धा खराब झाली आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना अस्वच्छेतला सामोरे जावे लागत आहे. इमारतीचे काम हे निकृष्ट केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपा ओबीसी सेलचे अलिबाग तालुकाप्रमुख अशोक वारगे यांनी केला आहे.

Updated : 16 Jun 2021 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top