अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा

42

कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी 12 ऑगस्टपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू होणार नाही. पण आता अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर केंद्रीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना आजपासून लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. यामध्ये आयकर विभाग, कस्टम विभाग, पोस्ट, राष्ट्रीय बँका, संरक्षण, न्यायालयातील कर्मचारी आणि राजभवानातील कर्मचाऱ्यांना आता परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आजपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहितीदेखील पियुष गोयल यांनी दिली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर 200 लोकल फेऱ्या सुरू होत्या त्यात आजपासून अतिरिक्त दीडशे फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर 202 फेऱ्या धावत होत्या. त्यात 148 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे आता दोन्ही मार्गांवर 350 लोकल फेऱ्या आजपासून सुरू झाल्या आहेत. पण सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा अजूनही बंदच राहणार आहे.

Comments