Home > मॅक्स रिपोर्ट > रायगडात रोगापेक्षा इलाज भयंकर

रायगडात रोगापेक्षा इलाज भयंकर

रायगडमध्ये रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना लसीकरणासाठी पहाटे 3 वाजता येऊनही लस दिली जात नाही. काय आहे सर्व प्रकार वाचा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट

रायगडात रोगापेक्षा इलाज भयंकर
X

लसीकरणासाठी नागरिकांची पुरती दमछाक, रात्री 12 पासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी; कोटा वाढवण्याची सुधागडवासीयांची मागणी. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्यानं लोक आता लसीकरणासाठी रांगा लावत लसीकरण केंद्राबाहेर उभी आहेत. महाराष्ट्रात जवळ जवळ सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील पाली सुधागडसह कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, लसीसाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. पहिल्या आलेल्या 80 लोकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी 12 वाजल्यापासून लोक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. मात्र, तरीही अनेकांना टोकन न मिळाल्याने त्यांना पुन्हा यावे लागत आहे.

या प्रक्रियेत नियोजन व इतर बाबींसंदर्भात गोंधळ असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सुधागड तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने कोटा वाढविण्याची मागणी दररोज केली जात आहे. पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जाते. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 100 जणांना म्हणजे एकूण 200 जणांना लस दिली जाते. 200 पैकी 40 लसी फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवल्या जातात. आणि 160 सर्वसामान्य नागरिकांसाठी दिल्या जातात. तालुक्याची लोकसंख्या पाहता ही संख्या खूप कमी असल्याने. नागरिकांची गैरसोय होते. यामुळे लसींचा कोटा व लसीकरण केंद्र वाढविण्याची आवश्यकता आहे. 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना लस देताना प्रशासनाची कसरत पाहून 18 वयोगटातील लसीकरण मोहीमेचे काय होणार? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.


पालीतील शाम खंडागळे यांनी सांगितले की, पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 वाजता टोकन देण्यात येतात. पहाटे 5 वाजता टोकन घेण्यास गेलो असता 3 वाजताच 80 लोकांची नावे घेऊन कोटा पूर्ण केला गेलेला होता. हा अनागोंदी कारभार बंद झाला पाहिजे. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी यांनी तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे. असे देखील शाम खंडागळे म्हणाले. ओळखीच्या माणसांना आधीच कुपनचे वाटप केले जाते. मग लवकर येऊन रांगेत उभे राहिलेल्यांचा काय फायदा?

या संदर्भात ऋषी झा म्हणाले की खेडेगावातून येणाऱ्या लोकांची प्रामुख्याने वृद्धांची खूप गैरसोय होते. मी आईला घेऊन 2 ते 3 वेळा फेऱ्या मारल्या. मात्र, कुपन मिळाले नाही. तर एकदा व्हॅक्सिन संपले होते. त्यामुळे अजूनही लस घेता आली नाही. अशा प्रकारचे अनुभव अनेक नागरिकांचे आहेत. पाली येथील सामाजिक कार्यकर्ते, बशीर परबलकर सांगतात...

मी देखील लस घेतली. मात्र, त्यासाठी मोठी कसरत करावी लागली. टोकन घेण्यासाठी वारंवार लोकांना फेऱ्या माराव्या लागतात. टोकन घेण्यासाठी गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. आलेल्या सर्व लोकांना टोकन देऊन त्यांना लसीकरणाच्या तारखा दिल्या पाहिजेत. याबरोबरच एक लसीकरण झालेल्यांना पुन्हा टोकन घेण्यासाठी उभे राहण्यापेक्षा त्यांना देखील ठराविक तारखा द्याव्यात. लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित चांदोरकर सांगतात... दुपारी लसीकरण काम संपल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी पुढील दिवसाच्या लसीकरणाचे टोकन नंबर दिले जावेत. जेणेकरून नागरिकांना रात्री बारा पासून सकाळी सात पर्यंत थांबावे लागणार नाही. आणि त्यांचा त्रास बंद होईल. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पाली-सुधागड येथील तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याशी या संदर्भात आम्ही बातचीत केली असता, ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गाव निहाय टोकन देण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच लसीकरण सुरळीत व्हावे व लोकांची गैरसोय थांबवावी. यासाठी एक्शन प्लॅन करत आहोत.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांच्याशी या संदर्भात बातचीत केली असता... टोकन वाटप संदर्भात योग्य पारदर्शकता बाळगली जात आहे. सकाळी 6 वाजता टोकन देऊन आधारकार्ड नंबर व रजिस्टरवर नोंद केली जाईल. यापुढे एका व्यक्तीला एकच कुपन दिले जाणार आहे. लोकांना कळाले की आता नंबर लागणार नाही. तर ते गर्दी करत नाहीत निघून जातात व पुन्हा येतात.

Updated : 29 April 2021 4:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top