Home > News Update > राहुल गांधींचे मोदींना पत्र म्हणाले ''भिकारी सारख्या शब्दांचा...''

राहुल गांधींचे मोदींना पत्र म्हणाले ''भिकारी सारख्या शब्दांचा...''

राहुल गांधींचे मोदींना पत्र म्हणाले भिकारी सारख्या शब्दांचा...
X

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधींनी काश्मिरी पंडितांच्या (kashmiri pandit) समस्या सांगितल्या आहेत. त्यांनी लिहिले की, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या काळात काश्मिरी पंडितांना खोऱ्यात काम करण्यास भाग पाडले जात आहे. तसेच त्यांच्यासाठी उपराज्यपालांनी (मनोज सिन्हा) 'भिकारी' सारख्या शब्दांचा केलेला वापर बेजबाबदारपणाचा आहे. त्यांनी पंतप्रधानांना काश्मिरी पंडितांच्या चिंता दूर करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले.

राहुल यांनी पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) लिहिलेले संपूर्ण पत्र काय आहे पाहुयात...

प्रिय पंतप्रधान,

आशा आहे तुमचे उत्तम चालले आहे. या पत्राद्वारे मी काश्मीर खोर्‍यातून विस्थापित काश्मिरी पंडित समुदायाच्या दुर्दशेकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित आणि इतरांच्या अलीकडच्या काळात झालेल्या टार्गेट हत्येमुळे खोऱ्यात भीतीचे आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपूर्ण भारताला प्रेम आणि एकात्मतेच्या धाग्यात जोडण्यासाठी चालू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या जम्मू टप्प्यात काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. सरकारीअधिकाऱ्यांना काश्मीर खोऱ्यात कामावर परत जाण्यास भाग पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षिततेची कोणतीही ठोस हमी न देता खोऱ्यात कामावर जाण्यास भाग पाडणे हे अत्यंत क्रूर पाऊल आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत आणि सामान्य होईपर्यंत सरकार या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांकडून इतर प्रशासकीय आणि सार्वजनिक कामांमध्ये सेवा घेऊ शकतात.

आपल्या सुरक्षेची आणि कुटुंबाच्या काळजीची याचना करणारे काश्मिरी पंडित आज सरकारकडून सहानुभूती आणि आपुलकीची अपेक्षा करत असताना, उपराज्यपालांनी (मनोज सिन्हा) त्यांच्यासाठी 'भिकारी' असे शब्द वापरणे हे बेजबाबदारपणाचे आहे. पंतप्रधान महोदय, स्थानिक प्रशासनाची ही असंवेदनशील कार्यशैली तुम्हाला कदाचित परिचित नसेल.

मी काश्मिरी पंडित बंधू आणि भगिनींना आश्वासन दिले आहे की त्यांच्या समस्या आणि मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मला आशा आहे की आपणास ही माहिती मिळताच आपण याबाबत योग्य ती पावले उचलाल.

माता खीर भवानीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो.

Updated : 4 Feb 2023 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top