Home > News Update > बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे परत यायला तयार – छगन भुजबळ

बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे परत यायला तयार – छगन भुजबळ

बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे परत यायला तयार – छगन भुजबळ
X

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी बंडानंतर पहिल्यांदाच मेळाव्याला संबोधित करत बंडामागील भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांनी त्यांच्या भोवताली असलेल्या बडव्यांना दूर करावं, आम्ही सगळे तुमच्यासोबत यायला तयार असल्याची भावनिक साद यावेळी भुजबळ यांनी शरद पवारांना घातलीय. भुजबळांच्या या आवाहनाला आता शरद पवार काय प्रतिसाद देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मुंबईच्या वांद्रे पश्चिम मधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये अजित पवार समर्थकांचा मेळाव्यात भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, आम्हांला समर्थन दिलेल्या आमदारांपैकी काही जण ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, काही परदेशात आहेत, काही आमदार आजारी आहेत, असं असलं तरी आम्हांला ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. नियमाबाहेर जाऊन काहीच केलेलं नाहीये, कायद्याचा अभ्यास करूनच आम्ही निर्णय घेतले आहेत. आमच्यासोबत कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी आहेत का, असा प्रश्न आम्हांला विचारला जातोय. एकच सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस नव्या दमानं वाटचाल करणार आहे, काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अजूनही अनेक नियुक्त्या बाकी आहेत. निवडणुका जवळ आल्या तरी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात नव्हत्या, असं सांगत भुजबळ यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावर थेट टीका केलीय.

जयंत पाटील यांच्यावरच भुजबळ यांच्या टीकेचा रोख होता. शरद पवार यांचंही कारभारी ऐकत नव्हते, अशी टीका जयंत पाटील यांचं नाव न घेता भुजबळांनी केली. बंडाची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू होती, असा धक्कादायक खुलासाच भुजबळ यांनी यावेळी केली. पक्षात सर्व समाज घटक आवश्यक असतात, असं मी त्यावेळी पक्षातील नेत्यांना सांगितलं होतं. इंडिया शायनिंगच्या काळात वेळ मिळाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला असता. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर महिन्याभरातच पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्याची आठवण भुजबळांनी यावेळी करून दिली.

भुजबळांच्या भाषणाचा रोख हा प्रामुख्यानं शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या दिशेनं होतं. भाकऱ्या फिरवायच्या म्हणाले पण हा रोटला बसलाय तो फिरवायचा ना, छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्यावर टीका. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेस ची साथ का सोडली ? अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी मागे कोण होतं ? असा थेट प्रश्नच छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का ? छगन भुजबळ असा प्रश्न विचारत भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.

२०१९ च्या निवडणुकीत आधी आणि नंतर काय बोलणी झाली ? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित करत एकीकडे दिल्लीत चर्चा करायचे आणि दुसरीकडे राज्यातील नेत्यांना तोंडघशी पाडायचे, याचा अर्थ काय असा प्रश्नच उपस्थित करून शरद पवार यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं निर्माण केले. यावेळी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवार यांचे भुजबळ यांनी समर्थन केले.

आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नसल्याच छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली भूमिका मान्य मग महाराष्ट्रात का नाही, असा थेट प्रश्नच भुजबळांनी शरद पवारांना विचारलाय. यावेळी भाषणाच्या ओघात भुजबळांनी शरद पवारांना विठ्ठलाची उपमा दिलीय. ते म्हणाले, “ साहेब आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलं आहे. शरद पवार साहेब, तुम्ही वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांनाही वाईट वाटलं होतं. मी बाळासाहेबांना सोडलं तेव्हा त्यांनाही असंच वाईट वाटलं होतं. धनंजय मुंडे तुमच्याकडे आले त्यावेळी गोपीनाथराव आणि बहीण पंकजा यांचीही असंच वाईट वाटलं होतं, असा घटनाक्रमच भुजबळांनी यावेळी मांडला. तुमच्या भोवतीचे बडवे बाजूला करा आम्ही सगळे तुमच्याकडे यायला तयार आहोत, अशी भावनिक सादच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना घातली. आम्ही सगळी व्यवस्था करूनच बाहेर पडल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Updated : 5 July 2023 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top