Home > News Update > भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेवर दरोडा; 2 कोटी 31 लाखांचा ऐवज लंपास

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेवर दरोडा; 2 कोटी 31 लाखांचा ऐवज लंपास

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेवर दरोडा; 2 कोटी 31 लाखांचा ऐवज लंपास
X

भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातून समोर आली आहे.शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या सियाज कारमधून आलेल्या पाच जणांनी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर भरदिवसा दरोडा टाकला. या दरोड्यात दरोडेखोरांनी 2 कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून या ठिकाणी व्यवस्थापक मोहित चव्हाण, रोखपाल सागर पानमंद आणि इतर दोन कर्मचारी हे बँकेत दैनंदिन कामकाज करत असताना, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या सियाज कारमधून आलेल्या पाच जणांनी गाडीतून उतरून बँकेत शिरले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे जण आत केबीनमध्ये शिरले. त्यांनी मॅनेजर आणि रोखपाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवत, जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे 2 कोटी रुपयांचे सोने आणि 31 लाख रुपये रोख असा एकूण 2 कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरोडेखोर ज्या कारमधून आले होते त्यावर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. पिंपरखेडपासून शिरूर पोलीस स्टेशन सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे , सहाय्यक फौजदार नाजीम पठाण हे घटनास्थळी दाखल झाले. पुणे आणि नगर जिल्ह्याची नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या. पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Updated : 21 Oct 2021 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top