Home > News Update > डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सनातनशी संबंधित ५ जणांवर आरोप निश्चित

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सनातनशी संबंधित ५ जणांवर आरोप निश्चित

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सनातनशी संबंधित ५ जणांवर आरोप निश्चित
X

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल ८ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणाच्या खटल्याला आता सुरूवात झाली आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाने बुधवारी ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. हे पाचही आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत. या सुनावणीवेळी पाचही आरोपींनी आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे.

विशेष सत्र न्यायाधीश एस आर नावंदकर यांनी बुधवारी पाचपैकी चार जणांवर हत्या, हत्येचा कट रचणे, शस्त्रास्त्र कायद्यातील तरतुदी आणि UAPA कायद्यांतर्गत आरोप निश्चित केले. यामध्ये आरोपी क्रमांकत १, २, ३ आणि ५ म्हणजेच वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हे वर उल्लेख केलेले आरोप ठेवण्यात आले आहेत. तर या प्रकरणातील आरोपी क्रमांक चार संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारश्वर मंदिरावजवळ हत्या करण्यात आली होती. यानंतर २०१४मध्ये CBIने या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून आपल्याकडे घेतला होता.

आरोप निश्चितीच्या वेळी कोर्टाने आरोपींना विचारणा केल्यानंतर सर्व आरोपींनी आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान कोर्टाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येरवडा कारागृहात हलवण्याचे आदेश दिले. सचिन अंदुरे सध्या औरंगाबाद आणि शरद कळसकर सध्य़ा येरवडा कारागृहात आहेत.

Updated : 15 Sep 2021 12:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top