Home > News Update > मुळशीत केमिकल कंपनीला आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश

मुळशीत केमिकल कंपनीला आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश

मुळशीत केमिकल कंपनीला आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश
X

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट एमआयडीसीत लागलेल्या आगीत 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचा आकडा मोठा असल्याचं समोर आलं आहे.

या कंपनीत सॅनिटायझर बनवलं जात होतं. या भीषण आगीत 18 लोक मृत्यूमुखी पडले असून मृत व्यक्तींमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. दरम्यान या आगीत अनेक लोक जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भात ट्वीट केलं आहे.

अतिशय दु:खद! उरवडे,मुळशी येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत काही कामगारांचा मृत्यु झाला.ही घटना अतिशय वेदनादायी आहे.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना.

असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.


दरम्यान या आगीत मृत पावलेल्य़ा व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असं अजित पवार यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

पुढे अजित पवार यांनी कुटूबियांबाबत सहानुभूती व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. अशी माहिती अजित पवार यांनी जाहीर केली आहे.

तज्ज्ञ समितीकडून चौकशीची घोषणा...

अजित पवार यांनी या घटनेची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच या चौकशीतून आगीची नेमकी कारणं कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तत्काळ दुर्घटनास्थळी पोहोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

प्राथमिक गुन्हा नोंदवला...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी करण्यात येणार असून पोलिसांनी या प्रकरणात प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला असून सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणं आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. यासारख्या घटना भविष्यात घडू नयेत,यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Updated : 7 Jun 2021 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top