Home > News Update > ...अखेर तिला न्याय मिळाला, डॉक्टर पतीला जन्मठेप

...अखेर तिला न्याय मिळाला, डॉक्टर पतीला जन्मठेप

...अखेर तिला न्याय मिळाला, डॉक्टर पतीला जन्मठेप
X

जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत हिचा 1 वर्षापुर्वी पतीने खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरुन खून करणाऱ्या पती डॉ. भरत लालसिंग पाटील यास न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली आहे. तर पुरावा नष्ट करणाचा प्रयत्न करणारे सासरे लालसिंग श्रीपत पाटील यांना ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयाने आज हा निकाल दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीतही केवळ तीन महिन्यात खटल्याचे कामकाज होवून निकाल देण्यात आला.

नेमकं काय आहे प्रकरण -

जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा १३ जानेवारी २०१९ रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. विद्या राजपूत यांचा मृत्यू झाल्यानंतर पती व सासरे या दोघांनी त्यांना जामनेर व नंतर भुसावळ येथील दवाखान्यात नेले होते.

प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. भुसावळ येथे मयत घोषित केल्यानंतर मृतदेह परस्पर बेलखेडे (ता.भुसावळ) या मुळगाव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता, तेथे विद्या राजपूत यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळंखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र चेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या.

प्रकरण संशयास्पद वाटल्याने विद्या यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता त्यासही पतीने विरोध केला. त्यामुळे ही माहिती वरणगाव पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह वरणगाव रुग्णालयात नेला. तेथे पंचनामा करून मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या राजपूत यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता.

याप्रकरणी १४ जानेवारी २०१९ रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी विद्या राजपूत याचे पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील या दोघांना या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पती कारागृहात होता तर सासरा लालसिंग पाटील हा जामिनावर होता.

Updated : 13 May 2021 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top