#LataMangeshkar : लता दीदींच्या निधनामुळे २ दिवसांचा दुखवटा, सोमवारी सार्वजनिक सुट्टी
X
भारतरत्न लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे जाहीर कऱण्यात आली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी आणण्यात आले आहे. येथे सर्वपक्षीय राजकीय नेते, तसेच बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी लता दीदींचे अंत्यदर्शन घेतले. यामध्ये राज ठाकरे, अमिताभ बच्चन, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजय-अतुल, मधुर भांडाकरकर, संजय लीला भन्साली यांच्यासह अनेकांनी प्रभूकुंजवर येऊन अंत्यदर्शन घेतले.
दोन दिवसाच्या राष्ट्रीय दुखवट्यात सर्व शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे.