Home > News Update > Lata Mangeshkar : निधनानंतर सर्व वाद संपले !

Lata Mangeshkar : निधनानंतर सर्व वाद संपले !

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर एकीकडे सर्वत्र शोक व्यक्त होत असताना, सोशल मीडियावर काही टीकात्मक पोस्टही करण्यात आल्या. पण पोस्टवर प्रकाश आंबेडकर, प्रा. हरी नरके यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

Lata Mangeshkar : निधनानंतर सर्व वाद संपले !
X

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर देखील अनेकजण आपापल्या परीने व्यक्त झाले. पण काही जणांनी या शोकाकुल वातावरणातही लता मंगेशकर यांच्याबद्दल काही टीकात्मक व्टिट केले होते. तसेच लता मंगेशकर यांच्यावर टीका करणाऱ्या काही जुन्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत.

लता मंगेशकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची गाणी गायली नाहीत, असा अनेकांच्या नाराजीचा सूर होता. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो."

अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडली आहे.



तर दुसरीकडे प्रा. हरी नरके यांची देखील एक जुनी पोस्ट व्हायरल झाली, ज्यामध्ये नरके यांनी लता मंगेशकर यांच्यावर टीका केली होती. पण ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रा.हरी नरके यांनी आपली भूमिका फेसबुक पोस्टमधून मांडली, तसेच लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे, त्यांच्याबद्दल कोणतेही आक्षेप नाहीत, तसेच आपल्याही विचारांमध्ये बदल झाल्याचे स्पष्ट केले आहे. पण लता मंगेशकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गाण्यास नकार दिला होता, त्यावर आपली नाराजी कायम असल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे ते पाहा...

"लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर माझी एक खूप जुनी पोस्ट सोशल मीडियावर फिरत असल्याचे एका मित्राने कळवले. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अशा पोस्ट मुद्दाम शोधून काढून फिरवणे औचित्याला धरून नाही. देशातील कोट्यवधी लोक दुःखात असताना अशी जुनी दुखणी उकरून काढणे तारतम्याने वागण्याला फाटा देणे होय.

१९९६ सालच्या अनुभवावर मी ती पोस्ट लिहिली होती. त्याला आता २५ हुन अधिक वर्षे होऊन गेली. जुन्याच जखमा किती दिवस कुरवाळत बसायच्या?

आता माझे विचार बदललेले आहेत. लताबाईंनी टोकाचे दारिद्र्य अनुभवलेले होते. वडिलांच्या व्यसनापोटी आलेल्या गरिबीचे चटके सोसल्यानंतर जर त्या हिशोबी बनल्या असतील, व्यवहारी आणि आर्थिक बाबतीत अगदी कंजूशही बनल्या असतील तरी ते वागणे समजून घ्यायला हवे असे मला आज वाटते. त्यांनी सहीला पैसे मागितले, ते तेव्हा मला खटकले पण आता असे वाटते की त्यांच्या नावाला वलय होते, आहे. ब्रँड नेमचे सहीचे पैसे घेणे हा व्यवहार आहे.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीते गायली असती तर मला अधिक आनंद झाला असता. त्यांनी नकार दिला याचे मला दुःख आहे. पण त्यासाठी केवळ मी त्यांच्या विरोधात लिहिणार नाही. लताबाईंना तसा निर्णय घ्यावासा वाटला असेल तर ठीक आहे. तो त्यांचा व्यावसायिक निर्णय होता.

त्यांची आई आणि वडील दोघेही सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या वर्गातून आलेले होते. त्याचे भरपूर दुःख लताबाईंनी भोगले असणार. अशावेळी आपली खरी ओळख, जात चोरून आपण उच्चजातीय असल्याचे जर त्या सांगत असतील व म्हणून बाबासाहेबांच्या गाण्यांना नकार देत असतील तर जे खेदजनक आहे पण अशी जात चोरावी लागणे हे अधिक भयंकर आहे. खरं तर त्यांना बाबासाहेब यामुळेच अधिक आपले वाटायला हवे होते. ज्यांनी कोट्यवधी वंचितांना, मागासांना आत्मसन्मान दिला, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. लताबाईंनी घेतलेला निर्णय समर्थन करण्याजोगा नसला तरी समजून घेतला पाहिजे असेच मी मानतो.

त्यांची सामाजिक-राजकीय मतं हिंदुत्ववादी होती. ती मला पटत नसली तरी ती बाळगण्याचा त्यांना अधिकार होता असेच मी समजतो.

त्यांच्या यशात मुख्यतः गीतकार, संगीतकार नी मग गायिका म्हणून त्यांचा वाटा होता हे खरे असले तरी जे यशस्वी असते त्याच्या आरत्या समाज करतो. ही समाजरीत आहे. तुम्हाला ती पटो अगर न पटो. ते वास्तव आहे.

लताबाईंची अनेक गाणी मला आवडतात, जगायला बळ देतात. त्यांची गाणी कोट्यावधी लोकांच्या काळजात आहेत. त्यांचा आदर आपण करायला हवा. त्यांचं जाणं मला उदास करून गेलंय. त्यांना विनम्र आदरांजली. त्यांचं बालपण नी उमेदीची वर्षे खडतर होती. त्यांचं उत्तर आयुष्य मात्र सुखात गेलं. सगळे मानसन्मान त्यांना लाभले. जाताना त्या सुमारे ४०० कोटी रुपयांची मालमत्ता मागे सोडून गेल्या. त्याना दीर्घायुष्य लाभले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्या गेल्या. तरीही त्या हव्या होत्या.

लताबाईंची गाणी आठवू या. त्यांच्या मृत्यूनन्तर माझी जुनी पोस्ट निरस्त झाली आहे. कृपया ती आता फिरवू नका."

: प्रा. हरी नरके,

७/२/२०२२

Updated : 6 Sep 2022 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top