Home > News Update > नगरकरांवर 'वाट दिसू दे रे....' म्हणण्याची वेळ ; सत्ताधारी नगरसेवकानेच दिला आंदोलनाचा इशारा

नगरकरांवर 'वाट दिसू दे रे....' म्हणण्याची वेळ ; सत्ताधारी नगरसेवकानेच दिला आंदोलनाचा इशारा

नगरकरांवर वाट दिसू दे रे.... म्हणण्याची वेळ ; सत्ताधारी नगरसेवकानेच दिला आंदोलनाचा इशारा
X

खड्डेच खड्डे चोहीकडे अशीच काहीशी परिस्थिती सध्या अहमदनगर शहराची झाली आहे. याच खड्ड्यांतून मार्ग काढताना नगरकरांचा संताप अनावर होत आहे. विशेष म्हणजे रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी चक्क सत्तेत असलेल्या नगरसेवकालाच आंदोलनाचा इशारा द्यावा लागला आहे. अहमदनगर महापालिका हद्दीतील बोल्हेगाव परिसरात गणेश चौक ते राघवेंद्रस्वामी मंदिर आणि केशव कॉर्नरपर्यंतचा रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाल्याने या प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव यांनी खड्डे बुजवण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात या भागातील खड्डे महापालिकेने बुजवले नाही तर शेकडो नागरिकांसह महापालिका इमारतीवरून उडी घेण्याचा इशारा आढाव यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आढाव यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे आणि महापौर रोहिणी शेंडगे यांना दिले आहे.





या भागातील रस्ते सध्या चिखलमय झाले असून येथील नागरिकांवर 'वाट दिसू दे रे...' म्हणण्याची वेळ आली आहे.

या भागात सर्वत्र खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रस्त्यांची झाली आहे.

दरम्यान याबाबत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना विचारले असता, अहमदनगर महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे, त्याचबरोबर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यामुळे या दोन्ही कामासाठी शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत, हे रस्ते दुरुस्त करण्याचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा महापालिकेला प्रयत्न आहे, अनेक नगरसेवकांनी रस्ता दुरुस्तीसाठी महापालिकेकडे निवेदन दिले आहे त्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान महापालिकेवर महापौर शिवसेनेचाच आहे, अशातच सत्ताधारी शिवसेनेच्याच नगरसेवकालाच आपल्या प्रभागातील कामं करून घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा द्यावा लागत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

याबाबत महापौर रोहिणी शेंडगे यांना विचारले असता त्यांनी पावसाळा झाल्यानंतर रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेणार असल्याचे म्हटले आहे.गणेशोत्सवाआधीपासून शहरातील विविध भागात रस्ता दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे, मात्र सततच्या पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे, राहिला निधीचा विषय तर या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे त्यांनी आम्हाला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे महापौर शेंडगे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वीच मनसेचे सुमित वर्मा यांनी देखील महापालिकेत रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन भरवत अहमदनगर शहरातील रस्ते दुरुस्तीकडे महापालिकेचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे वर्मा यांनी महापालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सार्वजनिक करत संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या भागातील खड्डे कधी बुजवणार याबाबत जाब विचारण्याचे आवाहन नगरकरांना केले आहे.



दोन दिवस आधीच महापालिकेकडून ऐतिहासिक अहमदनगर शहरातील विविध वास्तूंना भेटी देण्यासाठी दर शनिवारी आणि रविवारी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे, मात्र या बस सेवेच्या माध्यमातून नगर शहराचे 'खड्डे पर्यटन' नागरिकांना घडू नये यासाठी महापालिकेने तातडीने शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.

तर अहमदनगर महापालिका क्षेत्रातील बोल्हेगाव परिसरात राहणाऱ्या सुनिल क्षीरसागर या नागरिकाने 'अहमदनगर शहरात रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की, या रस्त्यावरून आया- बहिणींना पायी देखील चालता येत नाही' अशी खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता तरी येत्या काळात अहमदनगर महापालिका रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेऊन नगरकरांना दिलासा देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 29 Sep 2021 1:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top