Top
Home > News Update > पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी मौन सोडले

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी मौन सोडले

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी मौन सोडले
X

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर गेल्या १५ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर भाष्य केले. पूजा चव्हाण प्रकरणी आपल्यावर झालेले सर्व आरोप खोटे असून पोलिसांच्या चौकशीतून सत्य समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात राजकारण केले जात असून एका मागासवर्गीय नेत्याला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "पूजा चव्हाण या गोड बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल मला दुःख आहे. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझा समाज सहभागी आहे. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझं राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे पोलीस तपास सुरू आहे. चौकशीतून सत्य समोर येईल, असे त्यांनी सांगितले. गेले १५ दिवस आपण बाहेर पडलो नाही पण आता पुन्हा एकदा आपण आधीसारखे कामाला लागणार आहोत, असे सांगितले.

सोशल मीडियामध्ये पूजा चव्हाणसोबतच्या प्रसिद्ध झालेल्या काही फोटोंच्या संदर्भात संजय राठोड यांना प्रश्न विचारला तेव्हा आपण सार्वजनिक जीवनात असल्याने अनेकजण फोटो काढत असतात, एवढीच प्रतिक्रिया देत राठोड यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

दरम्यान कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता मुख्यमंत्र्यांनी नियम पालनाचे आवाहन केले असले तरी संजय राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनात हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसतले.

Updated : 23 Feb 2021 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top