भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर गुन्हा
X
सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि इतर ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचे निर्बंध असतानाही साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवजयंतीनिमित्त श्वेता महाले यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात महिलांची बाईक रॅली काढली होती. पण या रॅलीत कोरोना नियमांचे उल्लघन झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी श्वेता महाले यांच्यासह जवळपास ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी निघालेल्या बाईक रॅलीमध्ये आमदार श्वेता महाले, काही महिला लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या रॅलीमध्ये भाग घेतला होता. पण या रॅलीमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या बाईक रॅलीला पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच जमावबंदीचे आदेश लागू असूनही या नियमांचे पालन करण्यात आले नाही, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान या कारवाईवरुन आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिखली शहरामध्ये जिजाऊंच्या लेकींनी शांतते बाइक रॅली काढली होती, पण यामुळे जर त्या गुन्हेगार ठरणार असतील तर असे गुन्हे आम्ही वारंवार करण्यासाठी सुद्धा सज्ज आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. आम्हाला कोणी गुन्हेगार म्हटले तरी त्याची आम्ही तमा बाळगणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.