Home > News Update > चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या कविता

चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या कविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर तुषार पुष्पदीप सुर्यवंशी यांनी कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे.

चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या कविता
X

बा भीमा या कवितेतून गुलामीचं जगणं जगणाऱ्या माणसांना माणुसपणाची जाणीव करून देतांना ज्या पध्दतीने चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लावला. त्याविषयी आपल्या भावना मांडल्या आहेत.

बा भीमा,

तू जन्म घेतलास माणसात

आणि दैवाच अस्तित्व धोक्यात आलं,

तू माणसाला माणूस म्हटला

आणि माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली

वर्ण व्यवस्थेच्या दलदलीत तू बुद्ध रुपी

कमळ फुलवले आणि

ब्राम्हण

क्षत्रिय

वैश्य

शूद्र या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लागला.

तुषार पुष्पदिप सुर्यवंशी यांनी पुढे शतकानुशतकांची गुलामगिरी ते जातीयवादातून घडलेल्या रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाचा संदर्भ दिला आहे.

बा भीमा,

ही शतकांची गुलामी पदरी अजुन तशीच आहे

इथे माणसांच्या मनातली जातीची आग

दिवसागणिक वाढतांना पाहून स्वतःला कुठेतरी हरवून थोड हताश - हरल्या सारखं वाटत

म्हणून, भर सभेत कोणी जाती अंताची घोषणा केली

तर मला आता नवल वाटत नाही

मला अजूनही रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाचा हिशोब चुकता झाल्या सारखं वाटतं नाही

हत्याकांडाची आता मोठी यादी आहे

ती जणू इथल्या कवींना आपल्या कवितेत सजवायला कवितेच सौंदर्य म्हणून कामी येवू लागली

इथली नगर अजूनही जातीच्या पायाने उभी राहतात तेव्हा मला प्रश्न पडतो,

मी असा फकीर जात टाकून जावू कुठे ?

कारण जात नसलेली जमात अजुन जन्माला यायची आहे

आपल्याच जातीत चळवळ करणारी जमात

तुझ्या चळवळीला आमच्या दारात येवू देत नाही

बा भीमा, मग मी पुन्हा तुझ्या कडे येतो

आणी मग मी त्यांना सहज माफ करायला शिकतो

जी माझ्या सोबत द्वेषाने वागलीत

माझा ज्यांनी तिरस्कार केला

माझ्या पायाखालची जमीन माझ्या कडून हिसकावून घेतली, जणू त्यावर त्यांचाच अधिकार असल्यासारखी

बंधुता या शब्दाची ओळख त्यांना अजून पूर्तता झालेली नसली तरी मला ती आपलीच वाटतात

बा भीमा, तू दिलेला सर्वंकष मानवमुक्तीचा लढा मी

मी त्यांना पटवून सांगणार आहे

ते माझ्या दारात चळवळ येवू देत नसले तरी मी माझ्याच दारातून तुझी चळवळ उभी करणार आहे.

पुढे तिसऱ्या कवितेत तुषार सुर्यवंशी यांनी संविधानाचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे.

हे महाकवी, लोककवी तुझ्या रक्ता रक्तात लोकशाही भिणू दे

कारण तुला विसर पडलाय तुझ्याच जबाबदारीचा

तुला विसर पडलाय माणसांचा

माणसाच्या हक्काचां

तू विसरत चाललाय बांदा वरतून साखळ घालणाऱ्या त्या काळया आईच्या वेदनांना

तू भले बहाद्दर मंचावरतून उधळत असतो कविता

पण त्या कविता मला त्यांच्याच बाजूने झुकलेल्या वाटतात

जे तुलाच संपविण्यासाठी दिवसा ढवळ्या संविधान जाळतात

तुझ्या कवितेला दिलेला मंच हा व्यासांचा असतो रे, हे तुला कसे कळत नाही?

तो मंच संविधानाच्या खांद्यावर उभा केलेला असतो संविधान संपविण्यासाठीच

पण तू सगळं विसरून आता शहरात येवून बसलाय

पण विसरू नको ! संविधानाचे रक्षणकर्ते तयार होतात ते शेतात, मातीत, पाड्यावर, तांड्यावर, जंगलात, शाळेत आणि महाविद्यालयात

म्हणून तुझ्या कवितेने संविधान सोडवता येत असेल

तर आताच वेळ आहे

नाही तर पाश म्हणतो त्या प्रमाणे तुला जागं येई पर्यंत हे संविधान संपलेल असेल.

न्याय, समता, मानवता आणि सर्वंकष मानव मुक्तीच्या लढ्यासाठी कोणत्या अडचणी आहेत. कोणता भ्रम सर्वांसमोर आहे याबाबत भ्रम कवितेत भाष्य केलं आहे.

न्याय

समता

मानवता

आणि सर्वंकष मानव मुक्तीच्या लढ्यासाठी,

मी, जात

वर्ण

अस्मिता आणि पितृसत्तेच्या साऱ्या भिंती

तोडून आलो आहे.

कधीही न पाहिलेले 33 कोटी दैवत..

ज्यांना माझी माय जिवाच्या आकांताने पुजायची

उपवास,

पोथ्या,

मंत्र सर्वकाही करायची

भाबडी होती माझी माय,

मागायची त्या निष्ठुर देवांकडे आपली पाखरं, दारुड्या नवरा आणि संसारासाठी सुखाची भीक

ती सारी दैवत त्यांच्या वरची श्रद्धा कधीच झुगारून मी

विवेक,

विज्ञान,

बुद्धी असणाऱ्या आणि चिकित्सा करणाऱ्या समूहात शामील झालो

जिजाऊ, शिवराय, शाहू होतेच जवळचे

पण, मी

बुद्ध..

बाबा साहेब आंबेडकर,

गांधी, नेहरू

फुले, सावित्री

मार्क्स, लेनिन

भगतसिंह, चे, फिडेल

आण्णाभाऊ साठे, अमर शेख

फातिमा, मुक्ता

रमाई, ताराबाई,

पाश, फैज, ढसाळ

तुकाराम, कबीर, बहीनाई

आणि कॉम्रेड शरद पाटील

या सर्वांना ज्यांनी जात, वर्ग, स्री - दास्य आणि एकंदरीत मानव मुक्तीचा लढा दिला त्या सर्वांना मी जवळ केलं.

मी लढू पाहतोय जाती अंतासाठी

इथल्या शोषित, वंचित, पिढीत सर्वहारा वर्गासाठी

माझ्या हातात पुस्तक, लेखणी, डफ आणि यांसारखी अनेक हत्यार आहेत

पण..

परंतु..

पर..

But..

नेमकी माझी जात मला आडवी येते आहे, जी अल्पसंख्य आहे बहुसंख्यांकांमध्ये जिचा मी शेवट करू पाहतो आहे

कदाचित ती त्यांना खुणावत असावी,

ज्यांनी जाती अंताच सोंग घेतल आहे आणि जे करू पाहताय मला बाद त्यांच्या बहुसंख्य जातीतल्या वर्गातून

कदाचित हा माझा भ्रम तर नसेल?

अस असेल तर मला लढायला उमेद येईल

आणि असच असावं कदाचित..!

Updated : 5 Dec 2022 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top