Home > News Update > कोरोनाचा पहिला डोस योध्यांप्रती समाज कृतज्ञता: पंतप्रधान

कोरोनाचा पहिला डोस योध्यांप्रती समाज कृतज्ञता: पंतप्रधान

कोरोनाचा पहिला डोस योध्यांप्रती समाज कृतज्ञता: पंतप्रधान
X

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनामुळं हॉटस्पॉट ठरलेल्या भारतात अखेर लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी लसी निर्मितीच्या यशासाठी देशवासीयांचं अभिनंदन केलं. करोनामुळे मृत्यू झालेल्या कोविड योद्धे आणि नागरिकांविषयी संवेदना प्रकट केली.

पहिला कोरोना डोस दिल्यानंतर देशाला उद्देशुन मोदी म्हणाले, "आज भारत लसीकरण मोहीम सुरू करत आहे. तर यानिमित्तानं मी त्या दिवसांचंही स्मरण करत आहे. करोना संकटाचा तो काळ, जेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की काहीतरी करू. सामान्यतः आजारपणात पूर्ण कुटुंबचं आजारी व्यक्तीसाठी एकत्र येतं. पण या आजाराने रुग्णालाच एकटं करून टाकलं. अनेक ठिकाणी छोट्या बालकांना आईपासून दूर राहावं लागलं. आई त्रस्त व्हायची. रडायची. पण काही करू शकत नव्हती. मुलाला कुशीत घेऊ शकत नव्हती. वयोवृद्ध पालक रुग्णालयात एकटेच संघर्ष करत होते. मुलं इच्छा असूनही जवळ जाऊ शकत नव्हते. जे आपल्याला सोडून गेले, त्यांना परंपरेनुसार तो निरोपही मिळाला नाही, ज्याचे हकदार होते, असं मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, "त्यावेळचा विचार केला तर अंगावर शहारे येतात. उदास वाटू लागतं. पण संकटाच्या त्याच काळात, निराशेच्या त्या काळात कुणीतरी आशा पेरत होतं. आपल्याला वाचवण्यासाठी आपले प्राण संकटात टाकत होतं. आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, पोलीस यांनी मानवतेसाठी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं.

कित्येक दिवस घरीही गेले नाही. शेकडो सहकारी असेही आहेत जे पुन्हा घरी परत आलेच नाहीत. त्यांनी एका एका जीवाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आज करोनाचा पहिला डोस आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देऊन समाज कृतज्ञता व्यक्त करत आहे. मानवाच्या इतिहासात अनेक संकट, महामाऱ्या आल्या. संकट आली. पण, करोनासारख्या संकटाची कुणीही कल्पना केली नव्हती. याचा अनुभव विज्ञानालाही नव्हता अन समाजालाही," असं मोदी शेवटी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती दिली. "पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की, ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत," असं मोदी म्हणाले.


Updated : 16 Jan 2021 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top