Home > News Update > २०२५ मध्ये सोनं आणि चांदीपेक्षाही प्लॅटिनमने दिला जास्त परतावा

२०२५ मध्ये सोनं आणि चांदीपेक्षाही प्लॅटिनमने दिला जास्त परतावा

प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करावी का?

२०२५ मध्ये सोनं आणि चांदीपेक्षाही प्लॅटिनमने दिला जास्त परतावा
X

गुंतवणूकदारांना प्लॅटिनमने आतापर्यंत ४० टक्के परतावा दिलाय. उद्योगातील वाढती मागणी आणि त्यातुलनेत पुरवठा कमी असल्याने गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करत आहेत.

पश्चिम आशियातील तणाव,रशिया-युक्रेनमधील युद्ध आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जगभरात अस्थिरतेचे वातावरण आहे. या अस्थिरतेमुळे मूल्यवान धातू म्हणजेच प्लॅटिनम,सोने आणि चांदीने आतापर्यंत चांगला परतावा दिलाय. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केलाय. सोनं दराच्या बाबतीत दररोज नवे विक्रम करत असतानाही सोन्यापेक्षा प्लटिनममधील गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरलीय.

वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत प्लॅटिनमच्या किमतीत (Platinum Prices) 40 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. म्हणजेच, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना २०२५ मध्ये आतापर्यंत ४० टक्के परतावा (Platinum Return) मिळाला आहे. दुसरीकडे, या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत (Gold Prices) ३० टक्के आणि चांदीच्या किमतीत (Silver Prices) २६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

एका महिन्यात प्लॅटिनम ३० टक्क्यांनी वाढलं

प्लॅटिनमसाठी (Platinum) या वर्षाची सुरुवात काही खास नव्हती. सुरुवातीचे तीन ते चार महिने सोनं (Gold) आणि चांदीचं (Silver) बाजारात वर्चस्व होते, पण गेल्या एका महिन्यात प्लॅटिनमच्या किमतींमध्ये (Platinum Prices)मोठी वाढ झाली. यावर्षी आतापर्यंतच्या परताव्यात प्लॅटिनमने सोनं आणि चांदीला मागे टाकलं. गेल्या एका महिन्यात प्लॅटिनमच्या किमतीत (Platinum Prices) ३० टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली, तर याच कालावधीत सोनं ७ टक्क्यांनी आणि चांदी १३ टक्क्यांनी महागली.

प्लॅटिनमचे दर उच्चाकांवर

गेल्या महिन्यातील या जबरदस्त वाढीनंतर सध्या प्लॅटिनमची किंमत (Platinum Prices) १,२५० डॉलर प्रति औंस आहे. एप्रिल २०२१ नंतर म्हणजेच गेल्या चार वर्षांत प्लॅटिनमच्या किेमत (Platinum) सर्वाधिक वाढलीय. वाढती औद्योगिक मागणी आणि त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने प्लॅटिनमच्या किमती वाढत आहेत.

वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिल (WPIC) च्या मते, 2025 ते 2028 या काळात प्लॅटिनम बाजारात सरासरी ५,५०,००० औंसची कमतरता राहण्याचा अंदाज आहे. एकूण मागणीच्या सुमारे ७ टक्के कमतरता राहणार आहे.

या कारणांमुळे वाढत आहेत प्लॅटिनमचे भाव

प्लॅटिनम (Platinum) पुरवठ्यात दक्षिण आफ्रिका या देशाचं ७० टक्के योगदान आहे उत्खणणातील अडचणी आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे प्लॅटिनिमचा पुरवठा मर्यादित झाला आहे. याशिवाय, वाहन उद्योगातील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानात प्लॅटिनमची (Platinum) मागणी वाढली असल्याने किमतींना आधार मिळाला आहे. गुंतवणूकदारांमध्येही प्लॅटिनमची मागणी वाढत आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून प्लॅटिनम ईटीएफमध्ये ७०,००० औंसची आवक झाली आहे.

प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करावी का?

प्लॅटिनमची (Platinum) अस्थिरता गुंतवणूकदारांसाठी मोठा जोखीम आहे. सोनं (Gold) आणि चांदीच्या (Silver) तुलनेत प्लॅटिनमचा बाजार लहान असल्यामुळे किमतींमध्ये मोठे चढ-उतार दिसतात. जास्त जोखीम सहन करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी प्लॅटिनममधील गुंतवणूक योग्य आहे.

हायड्रोजन इंधन सेल आणि पर्यावरणीय मानकांमुळे प्लॅटिनमची दीर्घकालीन मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.

Updated : 14 Jun 2025 1:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top