Home > News Update > राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य :डॉ.सुधीर ढोणे

राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य :डॉ.सुधीर ढोणे

राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य :डॉ.सुधीर ढोणे
X

फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात हस्तक असणा-या शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र ख-या सूत्रधारावर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना डॉ. सुधीर ढोणे म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१७-१८ साली नाना पटोले यांच्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिका-याचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, नाना पटोले यांचे नाव अमजद खान असे ठेवले होते तर बच्चू कडू यांचे निजामुद्दीन बाबू शेख अशी मुस्लीम नावे ठेवली होती. फोन टॅपिंगचा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेतही उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते परंतु या नेत्यांचा याच्याशी काहीही संबंध नसताना तो दाखवून फोन टॅप करण्यात आले. फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे आहे. केंद्रातील मोदी सरकारनेही अशाच पद्धतीने पेगॅससच्या माध्यमातून मंत्री, राजकीय नेते, न्यायपालिका, पत्रकार यांची हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. तोही याच पद्धतीचा प्रकार होता.

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले ? फोन टॅपिंगचा मुळ उद्देश काय होता? रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून जलदगतीने तपास करावा आणि या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड कोण हे शोधून त्याच्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे.

Updated : 6 March 2022 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top