Home > News Update > 'खेड' शहराच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा निषेध, कौस्तुभ बुटाला यांचे जनजागृती आंदोलन

'खेड' शहराच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा निषेध, कौस्तुभ बुटाला यांचे जनजागृती आंदोलन

खेड शहराच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा निषेध,  कौस्तुभ बुटाला यांचे जनजागृती आंदोलन
X

खेड, रत्नागिरी : 'खेड' शहरवासियांच्या सुविधेसाठी बसवण्यात येत असलेल्या अत्याधुनिक शौचालयांना भावनिक कारणांसाठी विरोध करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात खेडमध्ये घंटानाद आणि निषेध फेरीचं आयोजन करण्यात आले आहे. कौस्तुभ बुटाला यांच्या प्रयत्नाने हिराभाई बुटाला विचारमंच आणि कल्याणी ग्रुपच्यावतीने दहा लाख किंमतीची दोन कंटेनराइज्ड शौचालये बसवण्यात येणार होती. पण या शौचालयाचे काम बंद पाडण्यात आल्याने खेडवासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

याविरोधात मंगळवारी मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विकासाच्या नावाने खेडवासियांची केलेली फसवणूक उघड करणे, तसेच विकासाच्या अनेक मुद्द्यांवर जनजागृती करण्याच्या मुख्य हेतूने खेडचे कौस्तुभ बुटाला यांनी मंगळवारी दुपारी तीन ते संद्याकाळी सात या दरम्यान शहरात निषेध फेरी व घंटानाद करणार असल्याचा इशारा दिला आहे. ही निषेध फेरी संपल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

खेड येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या समोरील डाव्या बाजुला कंटेनराईज्ड टॉयलेट बसवण्याचे काम खेड नगरपालिकेने सुरु केले होते. पण काम सुरु होताच काही 'राजकीय नाट्य'प्रेमीनी ते बंद पाडले. त्यामुळे खेडमध्ये राजकीय तसेच सामजिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काहींनी त्या ठिकाणी टॉयलेट होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली, तर काहींनी तेथेच टॉयलेट व्हावे या भूमिकेला उघडपणे पाठिंबाही दिला आहे.

मीनाताई ठाकरे नाट्यगृहासमोर जर हे आधुनिक टॉयलेट झाले, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला व पुरुष अशा सर्वच नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्याचा विचार करुनच या ठिकाणी हे टॉयलेट बसवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने अनेक महिलांची कुचबंणा होते. खेड शहर हे अनेक सुविधापासून वंचित आहे, म्हणून विकासाचा दृष्टीकोन ठेवूनच हिराभाई बुटाला विचार मंच व कल्याणी ग्रुपच्या मदतीने सुमारे १० लाख रुपये किंमतीची दोन शौचालये खेडमध्ये बसवण्यात येणार आहेत. या उपक्रमाला काहींनी विरोध केल्यामुळे संपूर्ण शहराचे नुकसान होत आहे, म्हणून जनजागृती करण्यासाठी निषेध फेरी काढण्यात येणार आहे.

"प्रस्तावित दोन शौचालये मीनाताई ठाकरे नाट्यगृहासमोर बसल्यानंतर लवकरच अजुन अशाचप्रकारची १० आधुनिक शौचालये खेड शहरात बसवण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने महिलांसाठी दोन शौचालय तर पुरूषांसाठी दोन मुतारी आहेत. याचा उपयोग जवळ असलेल्या शासकीय कार्यालय, तहसीलदार कचेरी, पोलिस ठाणे, दुय्यम निबंधक कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना, पादचारी नागरिकांना व बाहेरगावातून येणाऱ्या महिलांना होणार आहे. एस.टी.स्टॅंडमधील शौचालये गलिच्छ आहेत. त्याचा वापर मर्यादित आहे. जेव्हा भविष्यात नाट्यगृह सुरू होईल तेव्हा हि शौचालये कंटेनराईज्ड स्वरूपाची असल्यामुळे त्यांना पुन्हा काढून अन्य ठिकाणी हलविणे सहज शक्य आहे. खेड नगरपालिकेने योग्य विचार करूनच ही जागा दिली होती. पण त्याला विरोध झाला. खेड शहर स्वच्छतेकडे पुढे न्यायचे असेल तर अशा योजना स्वीकारणे हे सुसंस्कारी शहरातील नागरिकांचे काम आहे. या जागेवर हे शौचालय बनताच आणखी १० स्वच्छतागृहे खेडला मिळणार आहेत आणि ती मिळवायची असतील तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही" अशी भूमिका कौस्तुभ बुटाला यांनी मांडली आहे.

मीनाताई ठाकरे नाट्यगृह २००७पासून बंदस्थितीत असून ते सुरु व्हावे यासाठी एकाही राजकीय वा अराजकीय संस्थेने आंदोलन किंवा प्रयत्न केलेले नाहीत. नाट्यगृह सुरु करण्याबाबतही या निषेध फेरीच्या माध्यमातून मागणी करण्यात येणार आहे. खेड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सुमारे दोन किलोमीटर व्यासात सार्वजनिक शौचालय आणि सुविधा केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतरही नागरी प्रश्नांबाबत सामान्य नागरिकांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेऊन निषेध फेरी आयोजित करण्यात आली आहे. शहरातील प्रलंबित असलेल्या खांब तळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामात कोणतीही प्रगती झालेली नाही, ते बंद अवस्थेत आहे, याबाबत जनजागृती करणे व याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी निषेध व्यक्त केला जाणार आहे. या निषेध फेरीत कौस्तुभ बुटाला हे त्यांच्या १९ साथीदारांसमवेत सहभागी होणार असून कोविडबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नि:पक्षपातीपणे या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बुटाला यांनी केले आहे.

Updated : 8 Feb 2022 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top