Home > News Update > Pegasus : सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश?

Pegasus : सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश?

Pegasus : सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश?
X

Pegasus पाळत प्रकरणी केंद्र सरकारला दणका देत सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांचा समावेश असलेली एक स्वतंत्र समिती नेमली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याची तयारी दाखवली होती, पण कोर्टाने केंद्राचा समिती तयार करण्याचा प्रस्ताव नाकारला आणि स्वत: स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर.व्ही. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

सरन्यायाधीश एन.व्ही रमन्ना, न्या. सूर्यकांत आणि हिमा कोहली यांनी केंद्राला फटकारत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये ज्या सदस्यांना घेण्यात आले आहे, ते या विषयातील तज्ज्ञ आहेत, तसेच त्यांना कोणतेही पूर्वग्रह नाहीत, प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी करुन त्यांना समितीमध्ये घेण्यात आले आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

या समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ते पाहूया

समितीचे अध्यक्ष न्या. रवींद्रन

Pegasus प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष न्या. रवींद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून २००५ ते २०११ या काळात काम केले आहे. निवृत्तीनंतर देखील त्यांनी हादीया प्रकरणासह अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये तपास निरीक्षक म्हणून काम केले आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टाने नुकतीच त्यांची हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सुप्रीम कोर्टाचे सध्याचे न्यायमूर्ती यांच्याविरुद्धच्य़ा कट प्रकरणी चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. त्याचबरोबर त्यांनी News Broadcasting Standards Authority (NBSA) चे अध्यक्ष म्हणून २०१३ ते २०१९ काम केले आहे.

आलोक जोशी

न्या. रवींद्रन यांना आलोक जोशी या तपासामध्ये सहकार्य करणार आहेत. आलोक जोशी यांना तपास करतानाचे विविध कंगोरे माहिती आहेत आणि त्यांचे तांत्रिक ज्ञान प्रचंड आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. आलोक जोशी हे १९७६च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोचे सहसंचालक म्हणून काम केले आहे. तसेच 'रॉ'चे सचिव आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

डॉ. संदीप ओबेरॉय

या समितीमध्ये समावेश करण्यात आलेले डॉ. संदीप ओबेरॉय हे International Organisation of Standardisation/International Electro ¬Technical Commission च्या तांत्रिक उपसमितीचे अध्यक्ष आहेत. सॉफ्टवेअर सिस्टीम आणि उत्पादनांच्या क्षेत्रात सुविधा पुरवण्याचे काम ही समिती करते. जागतिक पातळीवरील सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तसेच नुकतेच त्यांनी TCSच्या सायबर सुरक्षा सेवा विभागाचे ग्लोबल हेड म्हणून काम केले आहे.

डॉ. नवीन कुमार चौधरी हे प्राध्यापक असून सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक विषयाचे तज्ज्ञ आहेत. तसेच सध्या ते गुजरातमधील National Forensic Sciences विद्यापीठात डीन म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. प्रभाहरन पी. हे केरळमधील अमृत विश्व विद्यापीठात इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत. कॉम्प्युटर सायन्स आणि सुरक्षा क्षेत्रातील त्यांचा २० वर्षांचा अनुभव आहे.

डॉ. अश्विन अनिल गुमास्ते IIT मुंबईमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांच्या नानावर २० पेटंट आहेत. तसेच त्यांच्या क्षेत्रातील १५० प्रबंध आणि ३ पुस्तकं देखील त्यांनी लिहिली आहेत. २०१२मध्ये विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार आणि २०१८ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाशी संबंधित स्वरुप भटनागर पुरस्कारांसह त्यांनाच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.

Updated : 27 Oct 2021 11:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top