News Update
Home > News Update > परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल गायब केला?

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल गायब केला?

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल गायब केला?
X

Photo courtesy : social media

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गायब केला, असा अत्यंत गंभीर आरोप माजी पोलीस अधिकारी समशेरखान पठाण यांनी केला आहे. त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना अनेक महिन्यांपूर्वी लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. तसेच परमबीर सिंग यांच्यावर देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शमशेर पठाण यांनी हा आरोप केला आहे.

समशेर खान पठाण यांच्या म्हणण्यानुसार, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एकाचवेळी पोलीस विभागातील विविध यंत्रणा करत होत्या. त्यावेळी परमबीर सिंग यांच्या देखरेखीखाली देखील तपास सुरू होता. त्यावेळी त्यांनी अजमल कसाब याचा मोबाईल घेतला, त्यानंतर त्यांनी तो जमा केला नसल्याचा आरोप समशेरखान पठाण यांनी केला आहे. हा मोबाईल परत मिळावा म्हणून गुन्हे शाखेचा अधिकारी परमबीर सिंग यांच्याकडे पाठवला असता त्या अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक देऊन त्यांनी हाकलून दिले असाही आरोप पठाण यांनी केला आहे. आजही परमबीरसिंग यांनी हा मोबाईल पोलीस विभागात जमा केला नसून. त्यांचा हा फार मोठा गुन्हा असल्याचे सांगत परमबीर सिंग यांना अटक करावी अशी मागणी समशेरखान पठाण यांनी केली आहे.

परमबीर सिंग डीसीपी असताना त्यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती, पण त्यांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून एका वर्षात त्यांनी आपली बदली केली, असा आरोपही शमशेर पठाण यांनी केला आहे. एवढेच नाही तर आजही परमबीर गँगचे काही पोलीस अधिकारी क्रीम पोस्टवर असून ते आजही परमबीर सिंग यांना मदत करतात आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या प्रत्येक कारवाईची माहिती देत असतात, असा आरोपही पठाण यांनी केला आहे.

Updated : 25 Nov 2021 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top