Home > News Update > फरार परमबीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर

फरार परमबीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर

फरार परमबीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर
X

फरार म्हणून घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस परमबीर सिंह अखेर मुंबई पोलिसांसमोर हजर झाले आहेत. गुरूवारी सकाळी परमबीर सिंह हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाले. सध्या परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा करत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून परमबीर सिंह हे गायब झाले होते, ते कोर्टात देखील हजर झाले नाही, त्यामुळे कोर्टाने त्यांना काही दिवसांपूर्वी फरारा घोषित केले होते.

आपल्याविरुद्ध दाखल झालेल्या सर्व प्रकरणांमध्ये आपण पोलिसांना सहकार्य करुन अशी माहिती त्यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर पत्रकारांना दिली. दरम्यानच्या काळात आपण चंदिगडमध्ये होतो अशीही माहिती त्यांनी दिल्याचे इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. कोर्टाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या राहत्या घरावर आणि वृत्तपत्रांमध्ये ते फरार असल्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. दरम्यान अटकेपासून संरक्षणासाठी परमबीर सिंह यांनी कोर्टात धाव घेतली. पण परमबीर सिंह कुठे आहेत ते सांगितल्याशिवाय सुनावणी होणार नाही, असे कोर्टाने सुनाल्यानंतर आपण भारतातच आहोत, अशी माहिती त्यांनी वकिलांमार्फत दिली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी आपल्याला मुंबई पोलिसांपासून जीवाचा धोका असल्याची आरोप केला होता. त्यानंतर कोर्टाने परमबीर सिंह यांना तूर्तास अटकेपासून संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. यानंतर परमबीर सिंह हे अखेर मुंबईत पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ठाणे आणि मुंबईत खंडणीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंह यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना खोटे गुन्हे दाखल करुन आपल्याला अकडवले आणि त्यांच्या जवळच्या माणसांमार्फत आपल्याकडून खंडणी वसूल केली असा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परमबीर सिंह यांचे अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या एका व्यक्तीला अटक देखील केली आहे.

Updated : 25 Nov 2021 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top