Home > News Update > नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या पारधी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या पारधी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अज्ञात कारणावरून बारावीत शिकणाऱ्या पारधी समाजातील विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले असून नातेवाईकांनी आत्महत्येला प्रवृत्त केलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या पारधी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
X



सोलापूर : पोखरापूर ता.मोहोळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या पारधी समाजातील विद्यार्थ्यांने अज्ञात कारणाने 29 नोव्हेंबर रोजी शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.आमचा मुलगा आत्महत्या करणाऱ्या मधील नव्हता.त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा.अशी मागणी मृताचे आई-वडील व नातेवाईकांनी मोहोळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून केली.दरम्यान घटनास्थळाला पोलीस उपअधीक्षक अमोल रामदास भारती,प्रांताधिकारी गजानन गुरव, पोलीस निरीक्षक अशोक सायकर,तहसीलदार प्रशांत बेडसें-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.




मोहोळ पोलीस ठाण्यासमोर आई-वडील व नातेवाईकांची न्यायासाठी याचना

मृत विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे आणला असता पारधी समाजातील कार्यकर्ते व नातेवाईक मोहोळ पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालय येथे जमले होते.त्यांनी काही काळासाठी मोहोळ शहरातील मेन रोड रोखुन धरला होता.दरम्यान काही वेळानंतर मोहोळ पोलीस स्टेशन समोर मृताचे आई-वडील व नातेवाईक यांनी ठिया मारून न्याय देण्याची पोलीस प्रशासनाकडे याचना केली.

फिर्यादीत काय म्हटले आहे

जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक राजेंद्र विष्णुपंत नाडगौडा यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,पोखरापूर येथे जवाहर नवोदय विद्यालय ही निवासी शाळा असून त्या शाळेमध्ये एकूण 350 विद्यार्थी होस्टेलमध्ये राहण्यासाठी आहेत.यामध्ये 205 मुले व 145 मुलींचा समावेश आहे.सदरच्या मुलांचे शेड्युल सकाळी सुरू होते.सर्व मुलांची सकाळी 5:45 वाजता विद्यालयाच्या मैदानावर व्यायामाकरिता हजेरी होते.व्यायामानंतर सर्व मुलांना अंघोळीसाठी 6:30 वाजता सोडले जाते.सदनांमध्ये एकूण 43 मुले राहत असून सर्व मुले फ्रेश होऊन नाष्टयाकरिता 8 वाजता भोजनालयामध्ये येतात.तेथे ही मुलांची हजेरी घेतली जाते.त्यानंतर शाळेमध्ये हजेरी घेतली जाते.मुले दुपारी 1:30 वाजता शाळेमधून भोजनालयात जातात.मुलांना 2 ते 3:30 वाजेपर्यंत त्यांच्या सदनांमध्ये विश्रांती असते.मुले 3:30 ते 5 वाजेपर्यंत शाळेमध्ये अभ्यास करतात.त्यानंतर मुले रूमवर जाऊन खेळाचा ड्रेस घालून सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत मैदानावर खेळतात.




देवानंद ज्ञानेश्वर भोसले वय-17 रा.मागी ता.करमाळा हा विद्यार्थी दिवसभर सर्व हजेरीला उपस्थित होता.त्यानंतर तो अभ्यासाकरिता 6:30 वाजता शाळेमध्ये गेला व परत 8 वाजता त्याच्या रूमवर आला.त्यानंतर सर्व मुलांची 8 ते 8:30 च्या दरम्यान भोजनालयामध्ये हजरी घेतली जाते. त्याठिकाणी देवानंद ज्ञानेश्वर भोसले अनुपस्थित होता.सदरच्या विद्यार्थ्याला बोलावण्यासाठी मुलांना रूमवर पाठवले असता देवानंद भोसले कोठेही दिसला नाही.परंतु रूममधील एक शौचालय बंद असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.त्यानंतर शिक्षकाने स्व:ता जाऊन पाहिले असता शौचालय आतून बंद होते.सदरच्या विद्यार्थ्याला आवाज दिला असता आतून कोणताही आवाज आला नाही.त्यानंतर सदरची घटना प्राचार्य संजय कोठारी यांना जाऊन सांगितली.बंद असलेल्या शौचालय मध्ये कोणीतरी आहे परंतु आतून आवाज देत नाही.आपल्या मधील देवानंद ज्ञानेश्वर भोसले हा विद्यार्थी हजेरीवर अनुउपस्थित आहे.त्यामुळे सर्व स्टाफने रूममध्ये जाऊन पाहिले असता शौचालय आतून बंदच होते.त्याबाबत वरिष्ठांना व मोहोळ पोलिसांना कळवले.सदरच्या ठिकाणी पोलीस आल्यानंतर पोलिसांनी व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी शौचालयाचा बंद दरवाजा तोडला असता अनुउपस्थित असणारा मुलगा देवानंद ज्ञानेश्वर भोसले वय-17 हा टॉयलेटच्या खिडकीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.सदर मुलाच्या आई-वडिलांना याबाबत कळवून मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे मृत विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्यात आला.

या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घोगरे करीत आहेत.

आमचा मुलगा आत्महत्या करण्यासारखा नव्हता

आमचा मुलगा आत्महत्या करण्यासारखा नव्हता.तो शाळेत हुशार होता.त्याला 90 ते 92 टक्के मार्क होते.हे अनपेक्षित काय घडले आहे आणि काय करत आहेत हे कळेना गेले आहे.असे गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे वडील ज्ञानेश्वर भोसले यांनी जड अंतकरणाने सांगितले.

मुलाला मोठा अधिकारी व्हायचे होते

मुलगा घरून शाळेत खुशीने हसत आला होता. त्याचे डोके तेज होते.त्याला लय मोठा अधिकारी व्हायचे होते.तो बळेच मरण्याजोगा नव्हता. ते पोरग बुजदील नव्हतं. त्याला दुनियेसाठी भरपूर काय करायचे होते.त्याच्या शिक्षणासाठी आम्ही साल धरले होते.तो मोठा अधिकारी होऊन आमचे उपकार फेडणार होता.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाईसाठी आई-वडील नातेवाईकांचा ठिय्या....

आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून त्यास आत्महत्येस प्रवृत्त कोणी केले. आम्हाला सीसीटीवी फुटेज द्या.अशी तक्रार मृत देवानंदच्या नातेवाईकांनी केली आहे. वस्तुस्थिती समजल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत देवानंदच्या आई-वडील आणि नातेवाइकांनी काही काळ मोहोळ येथे रस्त्यावर ठिय्या दिला.यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.आमची दखल घ्या. गरिबाला न्याय द्या.असं म्हणत आई-वडील आणि नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय तसेच पोलिस ठाण्यासमोर आक्रोश केला.मृत देवानंदची आई अश्विनी भोसले आणि वडील ज्ञानेश्वर भोसले यांनी आपला मुलगा आत्महत्या करणाऱ्या पैकी नव्हता त्याच्यावर कोणीही परिस्थिती आणली. याची चौकशी झाली पाहिजे. महाविद्यालयाच्या विरोधात आमची तक्रार आहे असं मत यावेळी त्यांनी मांडले आहे.




पोस्टमार्टमच्या रिपोर्ट आल्यानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल पोलीस उपअधीक्षक

शाळेचे सी.सी.टीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.मुलांचे जबाब घेण्यात येणार आहेत.डॉक्टरांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.मृत मुलाच्या आई-वडिलांच्या मागणीनुसार तपास करण्यात येईल.प्रथम दर्शनी मृत विद्यार्थ्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत.असे पोलीस उपअधीक्षक अमोल रामदास भारती यांनी सांगितले.

पारधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांनी सांगितले की,पोखरापूर येथील नवोदय विद्यालयामध्ये देवा ज्ञानेश्वर भोसले नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचे चित्र समोर आले आहे.महाराष्ट्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज समाज प्रगतीकडे नेहण्याचे काम करीत आहोत. त्याचे एक चित्र म्हणून देवाने महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक घेऊन जवाहर नवोदय विद्यालयामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते.अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून शिक्षणासाठी तो नवोदय विद्यालयात आला.पण त्याच नवोदय विद्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आमचे स्वप्न भंगले आहे.आज पारधी समाजातील तरुणाने प्रयत्न केल्यानंतर 14 वर्षांनी प्रवेश मिळाला होता.आज अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने याबाबतीत आम्हाला न्याय देण्यात यावा.यासाठी आम्ही मोहोळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला.एकीकडे पोलिसांच्या भीतीने रानावनात,जंगलात आमचा समाज भटकत आहे.पारधी गावात राहायला गेले तर गावाच्या भीतीने तो भटकत, हिंडत राहतो.शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या मदतीने तरुण पुढे येत असतील तर त्याला कुणाकडूनच न्याय मिळत नाही.शेवटी गुन्हेगार म्हणून जगण्याची दिशा आम्हाला मिळतेय.त्यामुळे शासन,प्रशासन यांनी आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीकडे नेहण्याचे काम करावे.ही घडलेली घटना दुर्दैवी आहे.याचा शासनाने विचार करून आम्हाला न्याय द्यावा असे भोसले यांनी शेवटी सांगितले.


Updated : 23 Dec 2021 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top