Home > News Update > मूर्ती चालल्या मूर्तिकारांकडे, पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम

मूर्ती चालल्या मूर्तिकारांकडे, पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम

मूर्ती चालल्या मूर्तिकारांकडे, पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम
X

गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करण्याची पद्धत आता वाढू लागली आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे देखील स्थापना केली जाते. या सर्व मूर्तींचे विसर्जन नदी किंवा तलावांमध्ये केले जाते. पण यामुळे नद्यांच्या प्रवाहावर आणि पाण्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जन करण्याची पद्धत देखील सुरू झाली आहे.

पण विसर्जनानंतर गणेश मूर्तीच्या मातीचं काय करायचं असा प्रश्न भाविकांना पडत असतो. यावर आता नवी मुंबईतील पनवेल वेस्ट वॉरियर्स या संस्थेने उपाय शोधून काढला आहे. गणेशमूर्ती पूजनानंतर, घरच्या घरी विसर्जन करून, उरलेली माती मूर्तिकारांना परत देऊन शून्य प्रदूषणाचा अभूतपूर्व उपक्रम खारघर, कामोठे, सुखापूर, पनवेल, नवीन पनवेल व करंजाडे येथील पनवेल वेस्ट वॉरियर्स या संस्थेने सुरू केला आहे.

मूर्तिकारांचा आर्थिक फायदा, पर्यावरण संरक्षण व मूर्तीच्या मातीतून परत देवाच्या मूर्ती घडून पवित्र व अध्यात्मिक लाभ अशी त्रिसूत्री असलेला कार्यक्रम साजरा केला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात लवकर न विरघळल्याने, मूर्तीचे अवयव भंगतात. मोठाले तुकडे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणून प्रवाह तुंबतात. त्याचबरोबर जलस्त्रोतांचा गढूळपणा, , उष्णता व क्षारांचे वाढते प्रमाण, पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. प्रकाश कमी मिळाल्याने प्रकाशसंश्‍लेषणात अडथळे येतात. मूर्तीच्या सिंथेटिक रंगातील जड व विषारी धातू पाणवनस्पती व मास्यांमधून अन्नसाखळीत प्रवेश करतात. विसर्जनानंतर कृत्रिम तलावातून काढलेले डेब्रीस हे देखील प्रचंड मृदा प्रदूषण करते.

दरवर्षी मूर्ती विसर्जनाचा आकडा 20 करोडच्या घरात जातो. पनवेल वेस्ट वॉरियर्सनी या परिस्थितीचा अभ्यास केला. काळाची गरज ओळखून मूर्ती घरच्याघरी विसर्जनानंतर राहिलेली माती मूर्तिकारांना भेट देऊन अनेक दुष्परिणाम थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी व वाहतूक कोंडी न करता, शून्य डेब्रीस, शून्य प्रदूषण व शून्य खर्चाचा हा उपक्रम सगळ्यांनी अनुसरावा असे आवाहन संस्थेने केले आहे.


Updated : 3 Oct 2022 4:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top