Home > News Update > पालखी मार्गासाठीच्या भूसंपादनात भेदभाव ?

पालखी मार्गासाठीच्या भूसंपादनात भेदभाव ?

मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी मार्गासाठी पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावातील अनेक कुटुंबाच्या जमीनी,जागा गेल्या असून यामध्ये दलित कुटुंबाच्या ही राहत्या जागा गेल्या आहेत. या गावातील ज्यांच्या जागा महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत,त्यांना दुप्पट मूल्यांकनाने पैसे दिले गेले आहेत. परंतु या महामार्गात ज्या दलित कुटुंबाच्या घर जागांचे दुप्पट मूल्यांकन झाले असताना 12 दलित कुटुंबांना मोबदल्यापासून डावलण्यात आल्याचा आरोप दलित कुटुंबानी केली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...

पालखी मार्गासाठीच्या भूसंपादनात भेदभाव ?
X

सोलापूर : मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून ठिकठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत. या रस्त्यासाठी जमीन,जागा भूसंपादन करण्याचे काम 2018 साली करण्यात आले होते. या रस्त्यावर असणाऱ्या ज्या गावातील लोकांच्या जमीनी,जागा महामार्गात गेल्या आहेत,त्यांना दुप्पट मूल्यांकनाने मोबदला देण्यात आला आहे. या रस्त्यात पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावातील अनेक कुटुंबाच्या जमीनी,जागा गेल्या असून यामध्ये दलित कुटुंबाच्या ही राहत्या जागा गेल्या आहेत. या गावातील ज्यांच्या जागा महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत,त्यांना दुप्पट मूल्यांकनाने पैसे दिले गेले आहेत.





परंतु या महामार्गात ज्या दलित कुटुंबाच्या घर जागा गेल्या आहेत,त्यांना दुप्पट मूल्यांकनानुसार प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पैसे दिले जात नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. याबाबतीत गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा सुरू असून येथील दलित कुटुंबांच्या मागणीकडे शासन,प्रशासन दुर्लक्ष करीत असून येणाऱ्या काळात प्रशासनाने आमची घरे पाडण्याचा प्रयत्न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा येथील बारा दलित कुटुंबांनी दिला आहे. तूंगत येथे पालखी महामार्गावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले असून येत्या आठ दिवसांत दुप्पट मूल्यांकनाने पैसे देण्याची प्रशासनाने जाहीर केले आहे.

या बाबतीत प्रशासनाने आणखीन चालढकल केल्यास येत्या 27 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन याची किती गांभीर्याने दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येवू लागली आहे.





12 दलित कुटुंबांची प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अडवणूक करण्यात येतेय का

तुंगत गावातील ज्यांच्या जागा,जमिनी सर्व्हिस रस्त्यात गेल्या आहेत,त्यांना डब्बल मूल्यांकनाने पैसे देण्यात आले आहेत. या गावातील बारा दलित कुटुंबांना प्रशासन सिंगल मूल्यांकनाने पैसे घेण्याचा तगादा लावत असल्याचा आरोप येतील दलित कुटुंबाकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत डब्बल मूल्यांकनाने पैसे मिळत नाहीत,तोपर्यंत आमच्या घराना प्रशासनाला हात लावू देणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या येतील 12 दलित कुटुंबे आणि प्रशासनामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यावा,अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तूंगत गावात जमीन खोदून महामार्गाचे काम सुरू

तुंगत गावातून पालखी महामार्ग जात असून येणाऱ्या काळात ट्रॅफिक ची समस्या निर्माण होवू,नये म्हणून याठिकाणी जमीन खोदून महामार्गाचे काम सुरू आहे. या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांची या महामार्गावर जाण्या-येण्याची सोय व्हावी,यासाठी येथून सर्व्हिस रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंडर ग्राउंड महामार्गाच्या वरच्या बाजूने सर्व्हिस रस्त्यासाठी संबधित घर मालकांच्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत. सर्व्हिस रस्त्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या लोकांच्या घर जागांचे मूल्यांकन करण्यात आले असून यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांना डब्बल मूल्यांकनाने पैसे मिळाले आहेत. परंतु राजकीय हेतूने किंवा जातीय आकास बुध्दीने संबधित प्रशासकीय अधिकारी केवळ आमच्या 12 कुटुंबाच्या लोकांना सिंगल मूल्यांकनाने पैसे घेण्यास सांगत आहेत. मोहोळ-पंढरपूर-आळंदी महामार्गात ज्यांच्या जागा जमिनी गेल्या आहेत. त्यांना एकसमान डब्बल मूल्यांकनाने पैसे दिले आहेत. तशा प्रकारचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. मग आम्हालाच सिंगल मूल्यांकनाने पैसे का घेण्यास सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रशासन जाणून बुजून त्रास देत,असल्याचे येथील दलित बांधव सांगत आहेत.






12 कुटुंबांना वेगळा न्याय का

मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी महामार्गासाठी अनेकांच्या जागा जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यांना डब्बल मूल्यांकनाने पैसे देण्यात आले आहे. महामार्गावर असणाऱ्या सर्वच गावातील लोकांनी याचा लाभ घेतला आहे. मग या बारा दलित कुटुंबांना वेगळा न्याय का दिला जात आहे. असा सवाल उपस्थित करण्यात येत असून यामध्ये प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येवू लागला आहे. यामध्ये प्रशासन जतीभेद करत असल्याची देखील भावना दलित बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जातीयवाद संपला असल्याच्या मोठ-मोठ्या गप्पा जरी मारल्या जात असल्या,तरी लोकांच्या डोक्यातून जातीयवादी मानसिक गेलेली नाही,अशी भावना तुंगत गावच्या लोकांनी बोलताना व्यक्त केली. केवळ आम्ही दलित असल्याचे डोक्यात ठेवून अडवणूक केली जात आहे. आमच्या घरांचे व्यवस्थितरित्या मूल्यांकन ही केले गेले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये प्रशासन काहीतरी गोलमाल करीत असल्याची भावना येथील दलित बांधवात निर्माण झाली आहे. येत्या काळात प्रशासन काय भूमिका घेते याकडे दलित बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात आले आंदोलन

तुंगत गावातील जी बारा दलित कुटुंबे डब्बल मुल्याकांच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये हा महामार्ग सुमारे दोन तास रोखून धरण्यात आला होता. त्यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येवून येत्या आठ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले असून याची पूर्तता नाही झाल्यास येत्या 27 सप्टेंबर रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.





सर्व्हे NHAIने केला असून त्यानुसारच आम्ही पैसाचे वाटप करतो - प्रांतधिकारी नागेश पाटील

या पालखी मार्गाचा सर्व्हे नॅशनल हायचे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केलेला असून त्यांच्या मूल्यांकनुसारच पैसे देण्यात येतात. या बारा कुटुंबांचा सिंगल मूल्यांकनानुसारच सर्व्हे झाला असून त्यानुसारच त्यांना पैसे मिळतील. तसे तर शासकीय जागेचे सिंगल मूल्यांकनानुसारच पैसे देण्यात येतात. ज्या गावातील नागरिकांनी शासकीय जागेचे दुप्पट मूल्यांकनुसार पैसे घेतले आहेत. निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रांतधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.

Updated : 16 Sep 2022 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top