News Update
Home > News Update > भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे: अभिनेता नितीश भारद्वाज

भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे: अभिनेता नितीश भारद्वाज

भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे: अभिनेता नितीश भारद्वाज
X

भारतीय समाजात प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या विविधांगी चिंतनाचा तसेच अनेक महान प्रेषितांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा संपूर्ण सारांश महात्मा गांधी यांच्या शिकवणीत आहे. त्यामुळे आज जगात विघटनकारी शक्ती सक्रिय झाल्या असतांना गांधी विचारच सा-या जगाला दिशादर्शक ठरु शकतो. असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वर्धा येथे केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयंतीनिमित्ताने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे 'गांधी का दर्शन : वैश्विक सांप्रदायिकता का समाधान' विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे तसेच दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

विद्यापीठाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह प्रसिध्द अभिनेते नितीश भारद्वाज आणि कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल होते.

महात्मा गांधी यांच्या विचाराचे औचित्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, गांधी विचारांचा जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभाव आहे. कारण इथल्या संस्कृतीतील श्रेष्ठ विचारांचे गांधीजी हे समग्र रुप आहे. त्यामुळे गांधी समजून घेणे आज अतिशय महत्वाचे आहे. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही मुल्ये परस्परपुरक आहेत. याच सत्यावर आधारलेला सत्याग्रह बापुजींनी सुरु केला. या लढ्यात अहिंसा हे त्यांचे महत्वाचे शस्त्र होते. त्या माध्यमातून मोठया शक्तीशी त्यांनी संघर्ष केला. स्वत:च्या वैयक्तिक जीवनात त्यांनी या मुल्यांचे निष्ठेने आचरण केले. त्यामुळे त्यांच्या विचारांना कृतीशीलतेचे मोठे अधिष्ठान लाभले आहे.

आत्मविश्वासपूर्ण शिक्षण देण्याऐवजी रोजगाराभिमुख शिक्षण दिल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून नितीश भारव्दाज म्हणाले, भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे. देशातील विद्यापीठानी याबाबत सकारात्मक प्रयत्न करुन संपूर्ण व्यवस्थेला विश्वास दयावा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात याबाबत काही कृतीशीलता दर्शविल्यास पुढील 25 वर्षात निश्चितच चित्र बदलेल त्यासाठी अनुकुल अशा जाणिवांचे दीप इथल्या हृदयात प्रज्वलित करावेत. आज आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरु आहेत.

असत्याकडून सत्याकडे होणारा जाणिवांचा प्रवास अधिक व्यापक करण्यासाठी गांधीविचार महत्वाचा असल्याचे सांगतांना कुलगुरु वरखेडी म्हणाले, गांधीजी हे पूर्णत: एक नव्या वर्गाचे प्रतिनिधी होते. महर्षी, देवर्षी आणि राजर्षी या व्यक्तीमहानतेच्या संकल्पनाच्या पारंपारिक चौकटीपलीकडे जाऊन त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. ते या दृष्टीने महात्मा होते. सांप्रदायिकता ही मानवतेला दानवतेकडे नेते. सत्यांचा एकच एक चेहरा असू शकत नाही. अनेक चेहरे असू शकतात. असे मानणारे महात्मा गांधी सत्योपासक होते. त्यांच्या नई तालीम मधील विचारांचा नव्या शैक्षणिक धोरणात अंगीकार करण्यात आला आहे.

विद्यापीठाकडून आयोजित होत असलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरु रजनीशकुमार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गेल्या वर्षभरात यानिमित्ताने आयोजित परिसंवादाचा असलेल्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत उपाध्याय यांनी केले. तर कुलसचिव कादर नवाज खान यांनी आभार मानले. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले.

Updated : 3 Oct 2021 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top