Home > News Update > "भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेचे" आयोजन; समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्या शुभेच्छा

"भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेचे" आयोजन; समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्या शुभेच्छा

भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेचे आयोजन;  समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्या शुभेच्छा
X

अहमदनगर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत स्नेहालय संस्थेने "भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेचे" आयोजन केले आहे, या यात्रेला अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यातून प्रारंभ झाला. सायकलस्वारांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, स्वातंत्र्य सेनानी आणि ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बराव, पद्मश्री पोपटराव पवार, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी ,आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे , रोटरीचे प्रांतपाल ओम मोतीपवळे, लायन हरजितसिंग वधवा,स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे आणि सचिव राजीव गुजर आदी उपस्थित होते.

काल (2 ऑक्टोबर) रोजी सकाळी 9वाजता नगरच्या भुईकोट किल्ल्यातील नेता कक्षासमोरील पटांगणातून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. बांगलादेश मुक्ती संग्रामात मोलाचे योगदान देणारे जवान, अधिकारी, तसेच शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या सायकल रॅलीमध्ये विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना यांच्यासह ज्येष्ठ मंडळीही सहभाग घेतला. यात्रेचा समारोप 16 डिसेंबर रोजी 1971 च्या युध्दाच्या स्वर्णिम विजय दिनी बांगलादेशातील नौखाली येथील गांधी आश्रमात होईल.

महाराष्ट्र,ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल ही राज्ये व बांगलादेशमधून सुमारे 3 हजार किलोमीटरचा प्रवास 100 सायकलस्वार करतील. थोड्या अंतरासाठी प्रत्येक गावातील युवा यात्रेसोबत सायकल चालवतील. रस्त्यातील गावांत मुक्काम करून, तेथील नागरिकांशी - स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधून मैत्री आणि सद्भाव वाढवण्याचा प्रयत्न यात्री करतील.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर नौखालीत उसळलेला हिंसाचार रोखण्यासाठी महात्मा गांधींनी 4 महिने नौखालीत वास्तव्य केले होते. गांधीजींचे कार्य आणि प्रेरणा जपणारा आश्रम तिथे आहे.

बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधत त्यांचे जन्मगाव तुंगीपारा, ढाक्यातील त्यांचे स्मारक आणि संग्रहालयाला सायकल यात्री भेट देतील.

Updated : 3 Oct 2021 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top