Home > News Update > शेतकरी आंदोलनासाठी सर्वपक्षीय एकवटले : शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची घेणार भेट

शेतकरी आंदोलनासाठी सर्वपक्षीय एकवटले : शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची घेणार भेट

चर्चेच्या फेऱ्यापाठून फेऱ्या सुरु असताना दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन मात्र थांबायला तयार नाही. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहे. पाच वेळा बैठक होऊन कोणताही तोडगा निघालेला नसून, शेतकरी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. याच विषयावर तोडगा काढण्यासाठी आता विरोधी पक्ष एकवटले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ते आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

शेतकरी आंदोलनासाठी सर्वपक्षीय एकवटले : शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची घेणार भेट
X

केंद्र सरकार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. कायदे रद्द करण्याबरोबरच हमीभावाची हमी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आपल्या मागण्यांवर शेतकरी ठाम असून, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या पाच फेऱ्या निष्फळ ठरलेल्या आहेत. पाचव्या फेरीतही केंद्राकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवारांसह विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पवार राष्ट्ररतींची भेट घेणार आहे.

शेतकरी कायद्याविरोधात विरोधी पक्ष एकवटत असून आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चाही झाली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेने पाठोपाठ अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपला धक्का बसला होता. तसंच, भाजपविरोधात व कृषी कायद्यांविरोधात लढण्यासाठी अकाली दलानं शिवसेनेची मदत घेतली आहे. आज यासाठीच अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेनं पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार आहे, अशी माहिती अकाली दलाचे खासदार चंदू माजरा यांनी दिली आहे. शिवाय, शरद पवार यांचीही आम्ही भेट घेणार असून ती आज झाली नाही तर दिल्लीत सर्व स्थानिक राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करणार असून अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल या बैठकीचे नेतृत्व करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 7 Dec 2020 3:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top