Home > News Update > ‘डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे आरोग्याच्या बाबतीत भीषण परिस्थिती’

‘डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे आरोग्याच्या बाबतीत भीषण परिस्थिती’

‘डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे आरोग्याच्या बाबतीत भीषण परिस्थिती’
X

परमेश्वरानंतर ज्यांना देव समजतो त्या डॉक्टरांवर वस्तूस्थिती लक्षात न घेता हल्ले केले जातात ते वाईटच असून डॉक्टरांवर असे हल्ले झाल्यास डॉक्टरकीच्या पेशाकडे जावे की नाही, अशी भावना तरुणांच्या मनात निर्माण होईल. परिणामी डॉक्टरच उपलब्ध होणार नाहीत आणि आरोग्याच्या बाबतीत भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय ह्दयरोग दिनाचे औचित्य साधून मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघ आणि ज्युपीटर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी एका आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्युपीटर हॉस्पीटलचे प्रमुख डॉ अजय ठक्कर यांनी सांगितले की या रुग्णालयात गरीब रुग्णांवर उत्तम उपचार कऱण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. दोन हजार बालकांवर येथे मोफत हृदरोगशस्त्रक्रिया करण्यात आल्याचे ते म्हणाले.

हृदरोग आदि अचानक उद्भवणार्‍या आजारावर तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत यासाठीचे एबीडी मशीन विकसित झाले असून डॉ. सुरासे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की तीन बटने असलेली हे मशीन नजिकच्या काळात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लावली जाऊ शकते. तेथील सुरक्षारक्षक देखील ते मशीन हाताळू शकते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील असेही ते म्हणाले. तर वापरण्यास सोपे असे हे यंत्र सर्व नव्या इमारतींमध्ये भविष्यकाळात बसवण्याचा नियम करण्याचा विचार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी खा. श्रीकांत शिंदे म्हणाले की, डॉक्टरने योग्य उपचार केले नाही म्हणून आमचा रुग्ण दगावला म्हणून डॉक्टरला दोषी धरुन त्यास मारहाण केली जाते. रुग्णालयाची तोडफोड केली जाते हे थांबवण्यासाठी माध्यमांनी समाजप्रबोधन करावे. रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये निर्माण होणारे गैरसमज यावर प्रसार माध्यमांनी प्रकाश टाकला पाहिजे, अशी अपेक्षा खा. श्रीकांत शिदे यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी ज्युपीटर रुग्णालयातील प्रसिध्द ह्दयरोग तज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर विवेचनपूर्ण मार्गदर्शन केले. रुग्णांनी चांगले आणि शास्त्रोक्त उपचार घेतल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच प्रकृती बिघडूच नये यासाठी आधीच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा मोलाचा सल्ला डॉ. सुरासे यांनी यावेळी दिला. ते म्हणाले आजच्या काळात जीवनशैली बदलत चालली असून फास्टफूडसारखे व पाकिटबंद पदार्थ खाल्ले जातात. याउलट पालेभाज्या, फळे, कडधान्य यांचा जेवणात वापर केल्यास आरोग्य चांगले राहील. शिवाय नियमित व्यायाम करणेही आवश्यक असल्याचे डॉ. विजय सुरासे यांनी सांगितले. प्रत्येकाला आपल्या कामाचे दडपण असते. पण त्याचा अधिक विचार न करता ते शांतपणे केल्यास ह्दयावर अधिक ताण येणार नाही, असेही डॉ. सुरासे म्हणाले.

Updated : 29 Sep 2019 4:17 PM GMT
Next Story
Share it
Top