Home > News Update > निखिल वागळे यांच्या मुद्द्यांना काही मुद्द्यांनी उत्तर : अजित जोशी

निखिल वागळे यांच्या मुद्द्यांना काही मुद्द्यांनी उत्तर : अजित जोशी

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या काँग्रेस बद्दलच्या टीकेला अजित जोशी यांनी मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

निखिल वागळे यांच्या मुद्द्यांना काही मुद्द्यांनी उत्तर : अजित जोशी
X

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मॅक्स महाराष्ट्रवरील आपल्या शो दरम्यान खासदार कुमार केतकर यांचे आणीबाणी बद्दलचे दावे खोडून काढले. तसंच काँगेस वर टीकाही केली. पण निखिल वागळे यांच्या मुद्द्यांना अजित जोशी यांनी उत्तर दिले आहे.

माननीय निखिल जी ,

१. या देशात २०१४ नंतर सर्व यंत्रणा 'मॅनेज' होतायत हे आपण पाहात आणि बोलतही आहात. न्यायव्यवस्था, माध्यमं, नोकरशाही, आरबीआय आणि इतर प्रत्येक यंत्रणेला मोदी/भाजपाच्या राजकीय उद्दिष्टांनुसार नाचावं लागत आहे, याबद्दल किमान आपल्याशी तरी वाद घालावा लागणार नाही. पण हे जर मान्य असेल, तर या सर्वात महत्त्वाची अशी निवडणूक यंत्रणा मात्र निष्पक्ष राहिली आहे, हे आपण कसं समजता? आणि इथे फक्त ईव्हीएम एव्हढाच मुद्दा नाही. मतमोजणी अधिकाऱ्यांपासून ते निवडणूक आयोगाच्या आयुक्तापर्यंत (लवासा आठवत असतीलच!) प्रत्येक व्यक्तीच्या निष्पक्षपणावर संशय घ्यायला जागा आहे. बिहार निवडणुकीतही आरजेडी आपल्याला विजयी सांगून नंतर पराभूत घोषित करण्यात आलं या तक्रारी करत होती, तेव्हा आपल्यासारख्याच राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक तटस्थ आणि अभ्यासू माध्यमांनी या आरोपावर काय संशोधन केलं? बरं, जर निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष नाही, हे मान्य केलं, तर राहुल किंवा काँग्रेसच्या कामगिरीचं मुल्यमापन कसं करणार? कृपया आपण भाजपाचा कट समजून घ्या... बाकीच्या सर्व यंत्रणा ते 'मॅनेज' करतात, कारण आपल्याला जनाधार आहे, हा त्यांचा दावा आहे. आणि हा दावा ते करू शकतात, ते निवडणुकात हेराफेरी करून. दुर्दैवाने आपण काँग्रेसवर या हेराफ़ेरीवर आधारित निकालांच्या जोरावर टीका करतो आणि भाजपच्या सापळ्यात चालत जातो!

२. अश्या निवडणुका मॅनेज होत असताना मोदींचा पराभव जटील आहे हे मान्य. तो काँग्रेस करू शकेल, असं आपल्याला वाटत नाही, हे समजू शकतो. पण मग कोण करू शकणार आहे? नॅशनल कॉन्फरन्स ते शिवसेना/जेडीएस, भारतातल्या जवळपास प्रत्येक पक्षाची कामगिरी भाजपासमोर घसरत्ये आहे. मग चर्चा वारंवार काँग्रेसचीच का? पुन्हा असा राजकीय किंवा चळवळीतला कोणता पर्याय उभा राहतो आहे का? मग आम्ही मोदींना विरोध करणाऱ्यांनी जावं कुठे? बाकी एकेकाळी आपण अण्णांना पाठिंबा दिला होता. त्याचा थेट फायदा भाजपाला झाला. त्या प्रकारात आपली भूमिका चुकली, असं वाटतं का? तसं वाटत असल्यास जरूर सांगावं, किंवा त्या सगळ्याच प्रयोगाची कठोर चिकित्सा जरूर करावी, हि नम्र विनंती!

३. सेक्युलॅरिजम काँग्रेसकडे गहाण टाकूच नये. तो दिसेल तिथे त्याच्या बाजूने उभं राहावं. पण आज भारतातल्या साम्यवादी वगळता प्रत्येक पक्षाने सेक्युलॅरिजमचा नाद सोडून कधी न कधी भाजपशी घरोबा केलेला आहे, हे आपण नाकाराल काय? सेक्युलॅरिजम काँग्रेसकडे गहाण नाही. पण लोकांच्या मनातून उतरलेली ही कल्पना फक्त काँग्रेसच अभिमानाने मिरवते, त्याचं काय? इतर पक्षांनी मिरवावी, ती उपलब्ध आहे...

४. काॅंग्रेस हा भाजपप्रमाणे सेक्युलॅरिजमचा शत्रू आहे, याची असंख्य उदाहरणं जरूर द्या. व्यक्ती आणि पक्ष, यातला फरक फक्त नीट समजून द्या, म्म्हणजे झालं. बंगालातले कम्युनिस्ट कार्यकर्ते उत्साहात दुर्गापूजा करतात, त्यामुळे सीपीएम आध्यात्मिक पक्ष म्हणावा का, हे ठरवायला लागेल. बाकी पक्ष म्हणून भाजपाप्रमाणे सेक्युलॅरिजमविरुद्ध काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेची उदाहरणं ऐकायला उत्सुक आहोत...!

५. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचं सत्य आपण मांडलं, हे उत्तमच! पण ते अर्धसत्य आहे. त्यांनी ती मागे घेतली, निवडणुकीत पराभूत होऊन सत्ता सोडली आणि लोकांत जाऊन भरघोस मतांनी ती परत मिळवली, आणि त्यानंतरही माफी मागितली, हे पूर्णसत्य आहे. आणीबाणीची मांडणी काही लोकं अर्ध्यावर का सोडतात, हे उमगत नाही...

६. पुन्हा एकदा, इतिहास चुकीचा सांगू नये, तसा अर्धवटही सांगू नये. १९७१ ला भरघोस मतांनी निवडून आलेल्या सरकारविरुद्ध घटनाबाह्य मार्गांनी आंदोलन कशी छेडली गेली, पोलीस आणि सैन्याने सरकारचे आदेश ऐकू नये, अशी आवाहनं (आणीबाणी यायच्या आधीच बरं का...!) कोणी दिली, अश्या अनेक पैलूंनी इतिहास नटलेला असतो. पण ते सोडा. १९७३ ते ७५ हा काळ आणि २०१४ ते २०२० या काळात आपल्याला गुणात्मक, संख्यात्मक फरक काही दिसतो? खास करून जाहीर न केलेल्या आणीबाणीचे परिणाम किती जास्त भयावह आहेत, हे खरंतर आपल्यासारख्या जिवंत माणसांनी जास्त प्रभावीपणे मांडावं. तेच पहिल्या आणीबाणीच्या अर्धवट सत्याशी तुलना करून आजच्या परिस्थितीच्या मांडणीतला प्रभाव कमजोर का करत आहेत?

७. समाजवादी, साम्यवादी, काँग्रेसी, सगळेच कधी न कधी चुकले. ते सोडून देऊ. पण संघाला पहिली प्रतिष्ठा नेहरूंनी मिळवून दिल्याचं ऐतिहासिक संशोधन आपण विस्ताराने मांडायला हवं. अशी प्रतिष्ठा मिळवून द्यायला नेहरूंनी संघ-प्रणित राजकीय पक्षाशी युती केली होती काय? 'संघ फॅसिस्ट असेल, तर मीही आहे', अशी विधानं करणारे 'लोकनायक' म्हणजे नेहरूच का? यावर जरूर प्रकाश टाकावा...

८. मोदी-शहांच्या दडपशाहीविरुद्ध राहुल-प्रियांका लढत आहेत. ट्विटर ते रस्त्यावर आंदोलनं करत आहेत. शेतीचे कायदे, हाथरस अश्या अनेक गोष्टींवर ठाम भूमिका घेत आहेत. आपण विचारवंत आहात, पत्रकार आहात, आपल्याकडून अपेक्षा नाही. पण तुम्ही स्वतःच म्हणालात म्हणून हा प्रश्न विचारावा लागतो, कि गेल्या सहा वर्षात आपण कितीवेळा रस्त्यावर उतरून थेट जनतेच्या मुद्द्यांवर आंदोलनं केली? तुरुंगात गेला? असो, तुम्ही लढवय्ये आहात आणि यापूर्वी अनेकदा तुम्ही हे केलेलं आहे, हे पूर्णतः मान्य आहे. आणि इथून पुढेही कराल, ही खात्री आहे.

१०. आपण मोदींविरुद्ध लढायचं आहे आणि सोबत लढायचं आहे, हे संपूर्णतः मान्य आहे. म्हणूनच आमची विनंती आहे, कि राहुल आणि काँग्रेसला सामील व्हा. सल्लागार किंवा वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर कार्यकर्ता म्हणून. प्रचंड मनःस्ताप होईल. काँग्रेसच्याच नेत्यांचीच कटकटही होईल. पण देशव्यापी उभं राहायचं तर हाच पर्याय आहे हे लक्षातही येईल.

बाकी काँग्रेसची उणीदुणी काढणं ही सध्या फॅशन आहेच! तुम्ही असल्या उथळ टीकाकारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहात, म्हणून हे सविस्तर उत्तर...

Updated : 21 Nov 2020 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top