Home > Election 2020 > आता देशाला कळेल खरा चौकीदार कोण ? तेजबहादुर यादव

आता देशाला कळेल खरा चौकीदार कोण ? तेजबहादुर यादव

आता देशाला कळेल खरा चौकीदार कोण ? तेजबहादुर यादव
X

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बिहारमधील बेगूसराय मतदारसंघानंतर आता वाराणसी मतदारसंघाने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये ठळक बातम्यांमध्ये जागा पटकावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मतदारसंघातून समाजवादी पार्टी आणि विविध संघटनांच्या पाठींब्यावर तेज बहादूर यादव या माजी सैनिकाने त्यांना आव्हान दिले आहे. निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना तेजबहादुर यादव यांनी सांगितले की आता खरा चौकीदार कोण आहे हे ओळखण्याची देशाला संधी असून सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा यादव यांनी केला आहे.

बीएसएफमध्ये कार्यरत असताना तेजबहादूर यादव यांनी सैन्यात मिळणा-या निकृष्ट दर्जाच्या जेणाबद्दल तक्रार केली होती, त्यासंदर्भातील व्हिडिओ देशभऱ व्हायरल झाल्यानंतर सैन्यावर प्रचंड टीकाही केली गेली होती. त्यामुळे यादव यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. आता यादव यांनी थेट पंतप्रधानांना निवडणूकीच्या माध्मयातून आव्हान देत व्यवस्थेवरील राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असून देशापुढील मुख्य समस्या सध्या तरुण शेतक-यांच्या आणि तरुण बेरोजगारांच्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगून यादव म्हणाले की, आता लोकांनी ओळखले पाहिजे खरा चौकीदार कोण आहे. तसेच निवडणूक जिंकून येईन असा मला आत्मविश्वास असल्याचेही यादव यांनी सांगितले.

येत्या 19 मे रोजी म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात वाराणसीत मतदान होणार आहे. समाजवादी पक्षाने अलीकडेच वाराणसी मतदारसंघातून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण सोमवारी समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांच्याऐवजी सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादुर यादव यांना उमेदवारी जाहीर केली. शालिनी यादव या माजी काँग्रेस खासदार आणि माजी राज्यसभा सभापती श्यामलाल यादव यांच्या सुन आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपले नजिकचे प्रतिस्पर्धी आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 3,71,784 मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला होता. नरेंद्र मोदी यांना एकूण 5,81,022 मते मिळाली होती. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना 2,09, 238 मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार अजय राय 75,614 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. तर चौथ्या स्थानावर बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार पाचव्या स्थानावर होते. त्यामुळे गेल्या निवडणूकीत पाचव्या स्थानावर असलेल्या समाज वादी पार्टीला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो यावरच यादव यांच्या राजकीय आकांक्षा अवलंबून आहेत. .

Updated : 30 April 2019 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top