Home > News Update > कोरोनाच्या भीतीने पाळीव प्राण्यांना दूर लोटू नका !

कोरोनाच्या भीतीने पाळीव प्राण्यांना दूर लोटू नका !

कोरोनाच्या भीतीने पाळीव प्राण्यांना दूर लोटू नका !
X

पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो का, अशी विचारणा करणाऱ्या तसेच लोकांनी घाबरून पाळीव प्राण्यांना घरातून काढून टाकल्याच्या किंवा दूर लोटल्याच्या तक्रारी शासकीय हेल्पलाइनवर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांपासून कोरोनासंदर्भात कुठलाही धोका नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना करावं लागलं आहे.

कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत,त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असं ट्वीट राजेश टोपे यांनी केलंय.

या ट्वीटवर पशूवैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. राजेंद्र तारे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणतात, पशुवैद्यीय म्हणून मी सांगू इच्छितो की, साथ चालू असलेला करोना हा फक्त माणसांचा आजार आहे. माणसांपासून माणसांना संक्रमण होते .माणसापासून प्राण्यांना व पक्षांना याची लागण होत नाही. तसेच हा आजार प्राण्यांपासून माणसाला होत नाही. पाळीव पशुपक्षी सुरक्षित असून त्यांची नेहमी सारखीच काळजी घ्या.

काही वाॅटस्एप समुहात पाळीव प्राण्यांसोबत घबराट पसरवणारे मेसेज टाकण्यात आले होते, त्यामुळे लोक भयभीत आहेत, असं पाणवठा या अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमाचे संचालक गणराज जैन यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं. ते म्हणाले, मलाही विचारणा करणारे काॅल आले. मी सांगितलं, मी स्वत: पन्नास प्राण्यांसमवेत राहतोय. प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती माणसांच्या तुलनेत कमी असल्याने उलट माणसांकडून प्राण्यांना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे आम्हीच लोकांना सद्या पाणवठात येण्यास मनाई केलं आहे.

खरं तर या संदर्भात, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा स्पष्ट केलंय की पाळीव प्राण्यांना कोरोना संसर्ग होत असल्याचा किंवा प्राण्यांकडून तो माणसांकडे फैलावत असल्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही.

उल्हासनगरातील नामांकित डाॅक्टर प्रभु आहुजा यांच्या घरात पाळीव कुत्र्या मांजरांचा मुक्त वावर असतो. त्यांनी सांगितलं की आम्ही आणि आमचे पाळीव प्राणी दोघेही घरात सुरक्षित आहोत.

Updated : 22 March 2020 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top