नितीशकुमारांना महाआघाडीत यायचं होतं, पण मीच घेतलं नाही: लालू
Max Maharashtra | 5 April 2019 11:30 AM IST
X
X
'जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा लालू' अशी ओळख असलेल्या माजी केंद्रीय आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी पुस्तक लिहिलं आहे. जर पुस्तक लालूंनी लिहिलं असेल तर चर्चा तर होणारच आणि ही चर्चा निश्चितच राजकीय असणार. अपेक्षेप्रमाणे लालू यांच्या 'गोपालगंज टु रायसीना: माय पॉलिटिकल जर्नी' या आत्मचरित्रात राजकीय खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खुलासा म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा महाआघाडीत यायचं होतं, पण मीच त्यांना महाआघाडीत घेतलं नाही, असा गौप्यस्फोट लालू यांनी या पुस्तकात केला आहे.
महाआघाडीला सोडून भाजपसोबत नवीन ससार थाटणाऱ्या नितीशकुमार यांना सहा महिन्यातच पुन्हा महाआघाडीत यायचं होतं. मात्र, आपणच त्यांना महाआघाडीत घेतलं नाही. असा गौप्यस्फोट लालू यांनी या पुस्तकात केला आहे.
काय म्हटलंय पुस्तकात?
जेडीयूचे उपाध्यक्ष आणि त्यांचे विश्वासू सहकारी प्रशांत किशोर यांना एक नव्हे पाचवेळा माझ्याकडे पाठवून माझी मनधरणीही करण्याचा प्रयत्न केला. पण मी नितीशकुमार यांना महाआघाडीत घेण्यास विरोध केला. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस होता म्हणून नव्हे तर त्यांच्यावरचा विश्वास उडून गेल्यानेच मी त्यांना महाआघाडीत घेण्यास विरोध केला होता. जेडीयूला मी लिखित पाठिंबा दिला तर नितीशकुमार भाजपची साथ सोडून महाआघाडीत येतील, असं सांगण्याचा प्रशांत किशोर यांनी भरपूर प्रयत्न केला. पण मी त्याला दाद दिली नाही, मी प्रशांत किशोर यांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर २०१५ मध्ये भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्यांची प्रतिक्रिया काय उमटली असती असं लालू यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
दरम्यान लालू यांच्या या दाव्याचे जेडीयूचे महासचिव केसी त्यागी यांनी खंडन केलं आहे. २०१७ नंतर नितीशकुमार यांनी कधीच महाआघाडीत जाण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. असं त्यांनी स्पष्ट केलं असून प्रशांत किशोर यांनी यावर प्रतिक्रिया देताना...
मी काहीच बोलणार नाही आणि काहीही कन्फर्म करणार नाही. तुम्हाला हवं ते तुम्ही लिहू शकता, असं सूचक वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलंय.
कोणी लिहिलं पुस्तक?
लालूंनी हे पुस्तक स्वत: लिहिलं नसून नलिनी वर्मा यांच्या सहकार्याने हे लिहलं आहे. रुपा पब्लिकेशनकडून हे पुस्तक प्रकाशित केलं जाणार आहे.
Updated : 5 April 2019 11:30 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire