दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन तातडीने रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह उपस्थित होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

चक्रीवादळाच्या संकटातून बाहेर पडलो तरीही कोरोनाचं संकट गेलेलं नाही. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे, त्याची साफसफाई करावी लागेल, झाडाचा पाला कुजेल, जनावरे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले असेल तर सडण्याची शक्यता आहे, त्यातून रोगराई होण्याची शक्यता आहे, ही साफसफाई लवकर झाली पाहिजे.

विजेचा प्रवाह, मोबाईल कनेक्टिव्हिटी पूर्ववत झाली पाहिजे, काही जणांची घरे पडली आहेत त्यांना सुरक्षित स्थळी जरूर हलवले आहे, पण त्यांच्या घरांची नासधूस झाली आहे, या काही प्राधान्यक्रमाने करण्याच्या गोष्टींबद्दल प्रशासन सतर्क आहे. त्याला प्राधान्य देऊन आपण कामं करतो आहोत.

पूर्ण सतर्कतेने प्रशासन दक्ष आहे, काळजी घेत आहे. मला खात्री आहे की लवकरात लवकर माझा रायगड आणि माझे सगळे जिल्हे हे पूर्ववत करू आणि जनजीवन सामान्य करू.

रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहे, इतर प्रभावित जिल्ह्यांनाही आर्थिक मदत देणार

रायगड आणि वादळ, शिवरायांची ही भूमी आहे, वादळं पचवणं हे रायगडसाठी नवं नाही, पण आजची स्थिती वेगळी, पंचनामे होत आहेत, लोकांना स्थलांतरित करुन सुरक्षित ठेवलं, जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आलं