Home > News Update > नवा बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करा: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नवा बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करा: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नवा बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करा:  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
X

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विकास कामे, राज्य सरकारच्या योजनांसह कार्याची माहिती दिली.

राज्यपालाच्या भाषणातील मुद्दे:

1. सर्वप्रथम मी देशाच्या प्रजासत्ताकाच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

2. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो.

3. माझ्या शासनाने नुकताच मुंबई ते नागपूर या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटर लांबीपैकी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पाचशे एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करुन हा रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जोडले गेले आहेत.

४. मुंबई तसेच नागपूर, पुणे, ठाणे भागातील मेट्रो मार्गांची कामे दर्जेदार आणि जलद गतीने करण्यात येत आहेत. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच मेट्रो मार्ग दोन अ आणि मेट्रो मार्ग सात वरील दुसरा टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मेट्रो मार्ग एक, दोन अ आणि सात हे परस्पर एकमेकांशी जोडले गेल्यामुळे मुंबईला पहिले मेट्रो नेटवर्क मिळाले आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प (एमटीएचएल), कोस्टल रोड यासह मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे.

५. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाटात नवीन मार्गिका बांधत आहोत. वर्सोवा - वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, ठाणे खाडी प्रकल्प, पुणे शहराभोवतीचा चक्राकार वळण मार्ग प्रकल्प (Ring Road), ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, वर्सोवा - विरार सागरी मार्ग प्रकल्प, रायगड जिल्हा ते सिंधुदूर्ग जिल्हा सागरी महामार्ग, विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.

६. युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंचाहत्तर हजार रिक्त पदे भरत असून नुकतीच याची सुरुवातही करण्यात आली आहे. राज्यातील अठरा हजार तीनशे एकतीस पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत.

७. विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये शेहचाळीस हजार एकशे चौपन उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

८. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दहा हजार रुपये वाढ केली असून आता ते वीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे. पाच हजार चारशे सहा स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ होणार आहे.

९. आणिबाणीच्या काळात लढा दिलेल्या व्यक्तींचा देखील सन्मान / गौरव करण्याबाबतची योजना पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली आहे.

१०. माझ्या शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी 'दिव्यांग कल्याण विभाग' या नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे.

११. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेतील सुमारे एक कोटी छप्पन्न लाख शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त माझ्या शासनाने चार शिधा - जिन्नसांचा समावेश असलेल्या 'आनंदाचा शिधा' संचाचे फक्त शंभर रुपये इतक्या माफक दराने वितरण केले आहे.

१२. सन दोन हजार सव्वीस - सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या देशाच्या उद्देशास सुसंगत असे एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य महाराष्ट्राने ठेवले आहे.

१३. राज्याच्या मंत्रीमंडळ उपसमितीने सत्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या आणि एकसष्ठ हजार चाळीस रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या एकूण चोवीस प्रकल्पांना मान्यता दिली आहे. मराठवाडा आणि विदर्भात सत्तेचाळीस हजार आठशे नव्वद रोजगार निर्मितीसह शेहचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले असून ते एकूण प्रस्तावित गुंतवणूक आणि रोजगाराच्या निम्म्याहून अधिक आहे.

१४. नुकताच दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतही एक लाख सदतीस हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आल्याने गुंतवणूकदारांचा राज्यावरील विश्वास प्रकट झाला आहे.

१५. महाराष्ट्राने G20 ची बैठक मुंबई आणि पुणे येथे नुकतीच यशस्वीरित्या आयोजित केली. नागपूर आणि औरंगाबाद येथेही G20 च्या बैठका होणार आहेत.

१६. राज्यात दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीसह 'महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान' सुरू करण्यात आले आहे.

१७. माझ्या शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमीतपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सात लाख वीस हजार पात्र खातेदारांच्या बचत खात्यावर दोन हजार सहाशे सदतीस कोटी रुपये इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट वितरीत करण्यात आली आहे.

१८. कोविड - एकोणीस मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांच्या बँक खात्यावर एक हजार बारा कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

१९. राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF - State Disaster Response Fund) दुप्पट दराने मदत देण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला. आतापर्यंत सात हजार तीनशे अकरा कोटी रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे.

२०. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडण्यात येत आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेच्या पाठीशी आहोत असा ठरावही राज्य विधिमंडळात आम्ही सर्वानुमते संमत केला आहे.

२१. देशातील आणि देशाबाहेरील मराठी भाषिकांसाठी "मराठी तितुका मेळवावा" विश्व मराठी संमेलन दोन हजार तेवीस प्रथमच मुंबई येथे नुकतेच पार पडले. दरवर्षी अशा स्वरुपाच्या विश्वसंमेलनाचे आयोजन करण्याचा माझ्या शासनाचा मानस आहे.

२२. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझ्या शासनाने राज्यातील पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केली आहे. सुमारे चार कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

२३. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत राज्यात चार जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जवळपास बावीस लाख मोफत उपचार शस्त्रक्रियांचा लाभ जनसामान्यांना देण्यात आला आहे.

२४. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.

२५. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात बहात्तर शासकीय वसतीगृहे भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येत आहेत. यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

२६. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करुन देण्यासाठी गडकिल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षीत स्मारके यांचे संवर्धन करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेत यासाठी तीन टक्के निधीची तरतूद केली आहे.

२७. राज्यातील एकूण तेहतीस हजार चारशे कोटी रुपये अंदाजीत किमतीच्या एकोणतीस जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण सुमारे पाच लाख सत्याऐंशी हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल.

२८. राज्यात 'जलयुक्त शिवार अभियान – दोन' ही योजना तसेच 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' ही योजना राबवीत आहोत.

२९. जलजीवन मिशनअंतर्गत एक कोटी पाच लाख पासष्ट हजार ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडण्या पुरविण्यात आल्या आहेत.

३०. कुपोषण रोखण्यासाठी माझ्या शासनाने मायग्रेशन ट्रॅकींग सिस्टीम हे नवीन ॲप विकसीत केले आहे.

३१. राज्यात नोव्हेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत एक लाख अठ्ठ्याणव हजार वैयक्तिक तर आठ हजार पाचशे इतके सामुहिक वनहक्क दावे मान्य करण्यात आले आहेत. वैयक्तिक दाव्यांसाठी एक लाख चौऱ्याएंशी हजार हेक्टर तर सामुहिक दाव्यांसाठी तेरा लाख अकरा हजार हेक्टर वनक्षेत्र मंजूर करण्यात आले आहे.

३२. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राज्यात एक लाख नऊ हजार घरकुले पूर्ण झाली असून सुमारे अडीच लाख घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत 'अमृत महाआवास अभियान – ग्रामीण' राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त घरकुले पूर्ण करण्याचा माझ्या शासनाचा मानस आहे.

३३. राज्यात वन व वन्यजीव संवर्धनाच्या अनुषंगाने अठरा नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या बावन्न होईल.

३४. राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी 'मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना' राबवत असताना महानिर्मितीने दोनशे सात मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केले आहेत. महानिर्मितीने आगामी काळामध्ये एकूण दोन हजार सातशे त्रेसष्ट मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणी करण्याचे नियोजन केले आहे.

३५. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. माझे शासन या खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे असून पदक विजेत्या खेळाडूंच्या रोख बक्षीसाच्या रकमेमध्ये भरघोस वाढ केली आहे.

३६. माझ्या शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीची स्थापना केली आहे.

३७. निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात "मित्र" ही संस्था तसेच राज्य आर्थिक सल्लागार परिषद देखील स्थापन करण्यात आली आहे.

३८. शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटविण्यासाठी 'सलोखा योजना' राबविण्यात येत आहे. तसेच 'महा-राजस्व अभियान' विस्तारीत स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

३९. राज्यातील पत्रकारांसाठी 'शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार निधी'मधून आतापर्यंत एक कोटी साठ लाख रुपये इतकी मदत करण्यात आली आहे. या योजनेतून दुर्धर आजारावर उपचारासाठी आतापर्यंत दोनशे त्रेसष्ट अधिस्विकृतीधारक पत्रकारांना मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान' योजनेतून राज्यातील एकशे चौपन्न ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा अकरा हजार रुपये सन्मान निधी दिला जातो.

४०. लम्पी चर्मरोगामुळे मृत एकूण अठरा हजार चारशे बत्तीस पशुधनासाठी सुमारे शेहचाळीस कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले असून पशुपालकांना अर्थसहाय्य देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

४१. नक्षलवादाचा बिमोड करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच नक्षलवाद्यांकरिता आत्मसमर्पण योजना राबविण्यात येत असून त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम मिळत आहेत.

४२. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माझे शासन काम करीत आहे.

४३. आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन करतो व सर्वांना पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Updated : 26 Jan 2023 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top