Home > News Update > ४ राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम

४ राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारने या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत नियमावली तयार केली आहे.

४ राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम
X

मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही नियमावली 25 नोव्हेंबर 2020 पासून अंमलात येणार आहे.

रेल्वे प्रवासा संदर्भात नियम

उपरोक्त राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या सर्व यात्रेकरूंनाही आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी सोबत ठेवावा लागेल. जर रेल्वे गाडी या राज्यांतून निघाली असेल किंवा तेथे थांबली असेल तरीही तेथील प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असेल. महाराष्ट्रात दाखल होण्याच्या 96 तास अगोदर कोविड-१९ चाचणीसाठी नमुना दिलेला असावा.ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल नसेल त्यांची कोविड-१९ लक्षणाची तपासणी आणि शरीराचे तापमान नोंदविले जाईल. यात्रेकरूंना कोविड-१९ ची लक्षणे नसतील तर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. कोविड-१९ लक्षणे असलेल्या प्रवाशांना वेगळे करून त्यांची एंटीजन टेस्ट घेतली जाईल. ही चाचणी जर निगेटिव्ह आली तर त्यांना घरी जाण्याची परवानगी असेल.जे प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळतील किंवा चाचणी केलेले नसतील त्यांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) ला पाठविले जाईल आणि तेथील सर्व उपचारावर त्यांना स्वतः खर्च करावा लागेल. संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यासाठी नोडल अधिकारी असतील आणि वरील सगळे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची खबरदारी घेतील.

रस्ता मार्गाने येणारे प्रवासी

सीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे दिल्ली एनसीआर त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीची आणि शारीरिक तपासणीची खात्री करण्याची व्यवस्था करतील. ज्या प्रवाशांना कोविड-१९ लक्षणे नसतील त्यांना दाखल होण्याची परवानगी असेल. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यांना परत त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्याची संधी दिली जाईल. अथवा त्यांना वेगळे करून एंटीजन टेस्ट घेतल्या जातील. जर ते निगेटिव्ह आले, तर त्यांना पुढे प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. ज्या प्रवाशांनी कोविड-१९ चाचणी केलेली नसेल किंवा जे पॉझिटिव्ह असतील, त्यांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये दाखल करण्यात येईल आणि संपूर्ण उपचाराचा खर्च त्यांना स्वतःला करावा लागेल.

देशांतर्गत विमान प्रवास

दिल्लीच्या नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर), त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून हवाई मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांजवळ आरटीपीसीआर अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल विमानतळावरील अधिकाऱ्यांना दाखवावा लागेल.

आरटीपीसीआर चाचणीसाठी दिलेला नमुना महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याच्या बहात्तर तास अगोदर घेतलेला असावा.ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल अटींची पूर्तता करणारा नसेल त्यांना त्याच विमानतळावर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागेल. यासाठी विमानतळ प्रशासन प्रवाशांच्या चाचणीसाठी विमानतळावरच ही सुविधा उपलब्ध करून देतील. ही चाचणी करून घेतल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. अशा सर्व प्रवाशांच्या संपर्काची माहिती व पत्ता विमानतळ प्रशासन प्राप्त करेल जेणेकरून जर कोणी यात्रेकरू पॉझिटिव्ह असेल तर नियमाप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करून पुढील कारवाई करणे सोपे होईल. नियमानुसार सर्व पॉझिटिव्ह प्रवाशांवर उपचार करण्यात येईल. या कारवाईत स्थानिक महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील आणि सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे याची खबरदारी घेतील.

Updated : 25 Nov 2020 3:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top