Home > News Update > महिला सक्षमीकरणासाठी पालीत बचत गट सभागृह उभारणार- आमदार अनिकेत तटकरे

महिला सक्षमीकरणासाठी पालीत बचत गट सभागृह उभारणार- आमदार अनिकेत तटकरे

महिला सक्षमीकरणासाठी पालीत बचत गट सभागृह उभारणार- आमदार अनिकेत तटकरे
X

रायगड : 50 टक्के आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना समाजकारण व राजकारणात सक्षमपणे नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्वराच्या भूमीत राज्यभरातून भाविक व पर्यटक मोठया संख्येने येतात, सुधागडात महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेले वेगवेगळे पदार्थ व विविधांगी साहित्य खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी पालीत बचत गट सभागृह उभारण्याची संकल्पना आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली.

पालीत अंगणवाडी सेविका , महिला बचत गट व भजनी मंडळ यांना आ.अनिकेत तटकरे, गीताताई पालरेचा यांच्या हस्ते विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या महामारीत अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवा केली. सामाजिक बांधिलकी जोपासत अविरतपणे आपले कर्तव्ये बजावणाऱ्या या सेवाभावी घटकांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे शासनस्थरावर प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न व सहकार्य करणार असल्याचे आ.तटकरे यांनी यावेळी आश्वाशीत केले. तसेच पालीकर जनतेला वर्षानुवर्षे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नळ पाणी पुरवठा योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही, पालीकर जनतेला पिण्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प जलदगतीने उभारण्यासाठी पावले उचलली जातील असे आ.तटकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच दुर्गम दुर्लक्षित भागात दर्जेदार व मजबूत रस्ते निर्माण करून दळण वळणाची साधने गतिमान करण्यासाठी मागणीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आ.तटकरे म्हणाले.

खा.सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून विविधांगी विकास कामांबरोबरच जनतेला भेडसावणारे प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी काम केले जात आहे असे तटकरे म्हणाले. यावेळी साक्षीताई दिघे, रुपाली भणगे,अभिजित चांदोरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका यांना जीवनावश्यक साहित्य तसेच महिला बचत गट व भजनी मंडळ यांना रोजगार निर्मितीसाठी आवश्यक ते साहित्य वाटप केले.

Updated : 20 Sep 2021 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top