Top
Home > News Update > भारत-चीन संघर्ष, शरद पवारांनी काँग्रेसला सुनावलं

भारत-चीन संघर्ष, शरद पवारांनी काँग्रेसला सुनावलं

भारत-चीन संघर्ष, शरद पवारांनी काँग्रेसला सुनावलं
X

गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान शहीद झाले, याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पण काँग्रेससोबत केंद्रात अनेक वर्ष सत्तेत सोबत राहिलेल्या आणि सध्या महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शरद पवार यांनी या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही अशी परखड भूमिका मांडली आहे.

“भारत चीन प्रश्नावर राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे लगेच दिल्लीतील कुणाचं फेल्युअर आहे वगैरे आरोप करणे योग्य नाही,” या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला फटकारले आहे.

१९६२ च्या युद्धानंतर जवळपास ४३ हजार किलोमीटर भूभाग चीनने ताब्यात घेतला आहे. ती जमीन अजूनही आपण परत मिळवू शकलेलो नाही, असं असताना आज राष्ट्राच्या सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. त्या वेळीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ताब्यात घेतलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, असं म्हणतात देशात सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसलाच एकप्रकारे शरद पवार यांनी जबाबदार धरले आहे.

“१९९३ साली देशाचा संरक्षण मंत्री असताना मी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी काही सीमांवर बंदुकीचा किवा शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार करायची चर्चा चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी केली होती. त्यावर पुढील काळात नरसिंहराव यांनी पुन्हा चीन दौरा करून तो करार अमलात आणला.”

अशी माहितीही शरद पवार यांनी दिली आहे. सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला, त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही असं म्हणत शरद पवारांनी थेट सोनिया आणि राहुल गांधी यांनाच तोंडघशी पाडलं आहे.

Updated : 28 Jun 2020 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top